परदेशात टीम इंडियाचे सामने असोत किंवा दीर्घ दौरे, खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांचेही तिथे दिसणं आता काही नवीन राहिलं नाही. मैदानाबाहेर पत्नी आणि मुलांचा पाठिंबा खेळाडूंना मानसिकदृष्ट्या दिलासा देतो, हे खरेच. परंतु अनेकांच्या मनात हा प्रश्न सतत येत राहतो. हे प्रवास, राहणीमान आणि इतर सर्व खर्च नेमका कोण करतो? त्यातही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय याचा यात काय सहभाग असतो? नुकतेच काही नवे नियम समोर आले असून, त्यामुळे अनेक शंका दूर झाल्या आहेत.

भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत परदेश दौऱ्यांवर जाताना कुटुंबियांना सोबत नेण्याची परंपरा बऱ्याच प्रमाणात अंगीकारली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात या गोष्टीला विशेष गती मिळाली.
कोहली स्वतः अनेकदा अनुष्का शर्मासोबत मैदानाबाहेर दिसत असे, तर रोहित शर्मा देखील आपल्या पत्नी रितिका आणि मुलीसह विविध दौऱ्यांमध्ये सहभागी झाला होता. चाहत्यांना हे दृश्य फारच आवडतं, पण बीसीसीआयच्या धोरणात त्यामागे ठाम नियम लपलेले आहेत.
बीसीसीआयचे नियम
बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था असून, ती खेळाडूंच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेत असते. त्यातच, परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंच्या कुटुंबांचा खर्च उचलण्याचा मुद्दाही याच अंतर्गत येतो. मात्र, हे सगळं ‘अनलिमिटेड’ नाही. काही ठोस मर्यादा आहेत आणि त्या पाळल्या गेल्याच पाहिजेत. सध्या लागू असलेल्या नियमानुसार, जर परदेश दौरा 45 दिवसांहून मोठा असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबीयांना केवळ 14 दिवसच संघासोबत राहण्याची मुभा असते. या काळात त्यांच्या विमान भाड्यांपासून ते हॉटेलमध्ये राहण्यापर्यंतचा खर्च बीसीसीआय करते. पण त्या 14 दिवसांपलीकडे जर कोणी राहायचं ठरवलं, तर त्याचा संपूर्ण खर्च त्यांनाच स्वतः करावा लागतो.
गौतम गंभीरकडून नियमाला समर्थन
त्याचप्रमाणे, जर दौरा छोटा असेल म्हणजे 45 दिवसांपेक्षा कमी तर ही परवानगी केवळ 7 दिवसांपर्यंत मर्यादित असते. आणि ही सवलतही फक्त एकदाच मिळते. म्हणजे संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत कुटुंबीय खेळाडूंसोबत सतत राहू शकत नाहीत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या सुमार कामगिरीनंतर बीसीसीआयने खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अतिरिक्त व्यत्यय टाळण्यासाठी हे नवे नियम लागू केले.
नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देखील या धोरणाला संमती दर्शवली आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, खेळाडूंनी त्यांच्या जबाबदाऱ्यांवर पूर्ण लक्ष द्यायला हवं आणि मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काही प्रमाणात पाठिंबा आवश्यक असला, तरी त्याची एक मर्यादा असावी. प्रशिक्षण, खेळातील सुसूत्रता आणि संघाच्या सध्याच्या कामगिरीचा विचार करता या अटी योग्य ठरतात, असं त्यांचं मत आहे.