भारत म्हणजे विविधतेचा संगम. प्रत्येक राज्य, प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खास चव, संस्कृती आणि खाद्यपरंपरा असते. जगभरात भारत शाकाहारी लोकसंख्येसाठी ओळखला जातो, इथं इतकी विविधता असूनही मोठ्या प्रमाणात लोक शाकाहारात विश्वास ठेवतात. पण याच देशात एक असं राज्य आहे, जिथे शाकाहारी व्यक्तीला अन्न मिळणं खूप मोठं आव्हान ठरू शकतं. कारण या राज्यात 99% लोकसंख्या मांसाहारी आहे.

नागालँड राज्य
भारताच्या ईशान्य भागात वसलेलं नागालँड हे राज्य यामागचं मुख्य उदाहरण आहे. निसर्गाने नटलेलं हे राज्य जसं सुंदर आहे, तसंच त्याची खाद्यसंस्कृती देखील पूर्णपणे वेगळी आणि खास आहे. नागालँडमध्ये मांसाहार हा केवळ चव म्हणून नसून, त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. मासे, डुकराचं मांस, कोंबडी आणि विविध प्रकारचे स्मोक्ड मीट हे त्यांच्या दैनंदिन जेवणात मुख्यत्वे दिसतात. अनेक घरांमध्ये दररोज मांसाहारी पदार्थ तयार होतात आणि पारंपरिक सण-उत्सवांमध्ये तर याचे प्रमाण आणखीनच वाढते.
येथील पारंपरिक अन्नात मसाल्यांचा वापर जरा कमी आणि नैसर्गिक चवांचा वापर अधिक असतो. लसूण, आल्याची पेस्ट, आणि स्थानिक मिरच्यांच्या साहाय्याने बनलेले पदार्थ फार लोकप्रिय असतात. उकडलेली भाजी, भात आणि सोबत झणझणीत चटणी ही त्यांच्या जेवणाची खास ओळख आहे. आणि हो, स्मोक्ड मीट म्हणजे धुरात साठवलेलं मांस हे नागा लोकांचं अतिशय प्रिय खाद्य आहे. ते केवळ टिकवण्यासाठी नाही, तर चव वाढवण्यासाठीसुद्धा वापरलं जातं.
शाकाहारी पदार्थ मिळणं अत्यंत कठीण
जर एखादी शुद्ध शाकाहारी व्यक्ती नागालँडला प्रवास करत असेल, तर तिला खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील, किंवा तयारीनिशीच जावं लागेल. इथं शाकाहारी पदार्थ मिळणं काही ठिकाणी शक्य असलं तरी सहज नसेल. बहुतेक रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड मांसाहारावरच भर देतात. त्यामुळे इथल्या प्रवासासाठी अन्नाचं नियोजन अत्यावश्यक ठरतं.
नागालँडचं हे वैशिष्ट्य केवळ त्यांच्या खाण्याच्या सवयींवरून नव्हे, तर त्यांच्या सांस्कृतिक रचनेवरूनही अधोरेखित होतं. त्यांच्या सणांमध्ये, पारंपरिक नृत्यांमध्ये आणि कौटुंबिक सोहळ्यांमध्ये मांसाहार हा एक आदरयुक्त स्थान असलेला घटक आहे.