सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूप वेगाने पसरत आहे. ती म्हणजे, “मार्च 2026 पर्यंत एटीएममधून ₹500 च्या नोटा बंद होणार आहेत.” अलीकडेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरतोय, ज्यात सांगितलं जातंय की ₹500 च्या नोटा हळूहळू चलनातून बाद केल्या जातील. त्यासाठी तारीखसुद्धा ठरवली गेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 75% एटीएममधून आणि 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएममधून या नोटा काढण्याचे आदेश दिले गेलेत, असं या मेसेजमध्ये म्हटलंय. एवढंच नाही, तर लोकांना आता घरातल्या ₹500 च्या नोटा वापरायला सांगितलं जातंय, कारण त्या लवकरच बंद होणार आहेत, असा गोंधळ उडवणारा सल्लाही दिला जातोय.

ही माहिती खरी आहे का?
या व्हायरल मेसेजबाबत केंद्र सरकारच्या अधिकृत ‘PIB Fact Check’ विभागाने स्पष्टीकरण दिलं असून, हे सर्व दावे पूर्णपणे बनावट असल्याचं सांगितलं आहे. PIB ने X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अशा प्रकारचे कुठलेही आदेश, परिपत्रक किंवा योजना अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे ₹500 च्या नोटा बंद होणार आहेत हा मेसेज फक्त अफवांवर आधारित असून, नागरिकांनी अशा गोंधळात न पडता अधिकृत माहितीची वाट पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
₹500 च्या नोटा या सध्या पूर्णतः वैध असून, त्या देशभरात व्यवहारासाठी वापरल्या जात आहेत. कोणताही व्यापारी, बँक किंवा एटीएम यामध्ये या नोटा नाकारल्या जात नाहीत. या नोटा रद्द करण्याचा सरकारचा कुठलाही निर्णय नाही आणि त्यामुळे त्या वापरण्यास घाबरण्याचं काहीही कारण नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नका
तसं पाहिलं तर नोटबंदीपासूनच अशा प्रकारच्या अफवांना खतपाणी घातलं जातं. कधी ₹2000 च्या नोटांबाबत, कधी नवीन चलन डिझाइनबाबत, तर कधी नोटा रद्द होणार म्हणून अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरतात. मात्र प्रत्येक वेळी आरबीआय आणि सरकारने स्पष्ट केले आहे की चलनासंदर्भात कोणतीही मोठी घोषणा फक्त अधिकृत मार्गांनीच केली जाईल.
त्या अनुषंगाने, अशा व्हायरल मेसेजकडे कानाडोळा करणे हाच योग्य मार्ग आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊन भीतीने किंवा गोंधळात येऊन नोटा खर्च करू नका किंवा दुसऱ्यांनाही गैरसमज पसरवू नका.