अलीकडेच रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. या चित्रपटाच्या भव्यतेबद्दल जितकी चर्चा होते आहे, तितकीच उत्सुकता त्याच्या बजेटविषयीही आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू करणारा क्षण ठरत आहे. ही गोष्ट विशेष ठरते कारण याच रामकथेला 38 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर आणलं होतं आणि त्याचा प्रभाव आजही लोकांच्या मनात टिकून आहे.

‘रामायण’मधील कास्ट आणि बजेट
नव्या रामायणात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असून, साई पल्लवी सीतेच्या रूपात झळकणार आहे. यश रावण साकारतो आहे आणि अमिताभ बच्चन, सनी देओल, विक्रांत मेस्सी यांच्यासारखे दिग्गज कलाकार यात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्याचे बजेट. सध्या उपलब्ध माहितीनुसार, या दोन भागांच्या सिनेमासाठी सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, जे भारतीय चित्रपट इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे बजेट ठरते.
या चित्रपटात केवळ स्टार्स नाहीत, तर तंत्रज्ञानाचाही भरघोस वापर करण्यात येणार आहे. IMAX तंत्रज्ञानाचा वापर, ऑस्कर-विजेत्या DNEG स्टुडिओची VFX जबाबदारी आणि AI डबिंगचा समावेश हे दाखवून देतो की या सिनेमाचा उद्देश फक्त भारतीय प्रेक्षकांपुरता मर्यादित नाही, तर हा जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी बनवला जात आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीत तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
रामानंद सागर यांच्या रामायणचे बजेट
दुसरीकडे, 1987 मध्ये रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर आणलेली ‘रामायण’ मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्या काळात तंत्रज्ञान नव्हतं, बजेट मर्यादित होतं, पण भावनांची खोली आणि अध्यात्माची जाणीव यामुळे ती मालिका अमर झाली. या मालिकेचं संपूर्ण बजेट फक्त 7 कोटी रुपयांच्या आसपास होतं. त्यात 78 भागांचा समावेश होता आणि प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती.
आजच्या काळात जिथं व्हिज्युअल इफेक्ट्स, मोठं बजेट आणि ग्लोबल मार्केटिंग यावर सिनेमांचं यश अवलंबून असतं, तिथं या नव्या ‘रामायण’कडून प्रेक्षकांची अपेक्षा खूप मोठी आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मनात अजूनही रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चा पवित्र स्पर्श आहे. त्यामुळे हा नवीन प्रकल्प केवळ तांत्रिकदृष्ट्या यशस्वी ठरणे पुरेसे नाही, तर त्यात अध्यात्म, भावनाशीलता आणि मूल्यांचंही प्रतिबिंब असायला हवं.