कधीकाळी जेव्हा न मोबाईल होते, न इंटरनेट आणि न टेलिफोन तेव्हा लोकांना दूरवरचे संवाद पोहचवायचे असायचे तेव्हा ते हवेत उडणाऱ्या एका पक्ष्यावर विसंबून असत. हा पक्षी म्हणजे कबुतर. हो, हेच ते कबुतर जे प्रेमपत्रांपासून ते युद्धातील आदेशांपर्यंत सगळं आपल्या पंखांवर घेऊन माणसांपर्यंत पोहचवायचे.

आज आपण वापरत असलेल्या जीपीएसपासून अनेक यंत्रणा त्याकाळी नव्हत्या, पण तरीही या पक्ष्यांची अचूकता आणि विश्वसनीयता इतकी विलक्षण होती की ते हजारो वर्षे माणसाच्या दैनंदिन जीवनात संवादाचे साधन बनले.
कबुतरांद्वारे पत्र पाठवण्याचा इतिहास फार प्राचीन आहे. इजिप्त, पर्शिया, भारत अशा अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये कबुतरांचा वापर शेकडो नव्हे, तर हजारो वर्षांपासून संदेशवाहक म्हणून होत होता. भारतात तर महाभारतातही याचा उल्लेख सापडतो. कबुतर केवळ एखादं निरुपद्रवी पक्षी नव्हतं, तर हे राजे-महाराजे, लष्करप्रमुख आणि व्यापारी यांच्यासाठी सर्वात विश्वासार्ह ‘मेल सर्व्हिस’ होतं.
कबुतराच्या नैसर्गिक GPSचं रहस्य
मग कबुतरच का? कारण यामध्ये एक अनोखी नैसर्गिक क्षमता असते ती म्हणजे होमिंग इन्स्टिंक्ट. ही त्यांची जादूच म्हणावी लागेल. सूर्याची दिशा, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र, वास आणि आजूबाजूच्या नकाशाच्या आधारे ते आपलं घर अगदी अचूकपणे शोधतात. आज आपण जीपीएस वापरतो, पण यांच्याकडे ती क्षमता उपजतच असते. म्हणूनच त्यांना ‘नैसर्गिक जीपीएस’ असंही म्हटलं जातं.
हे कबुतर कोणत्याही पत्राद्वारे संदेश नेण्यासाठी आधी प्रशिक्षित केली जात. एका विशिष्ट ठिकाणी त्यांना वाढवलं जायचं, आणि नंतर त्या ठिकाणाहून कितीही दूर नेलं तरी एकदा जर त्यांना मोकळं सोडलं, तर ते हवेमध्येच आपला मार्ग शोधत पुन्हा आपल्या घराकडे परत यायचं. त्यांच्या पाठीला किंवा पंजाला एक छोटंसं पत्र बांधलं जायचं आणि ते अगदी वेळेत पोहचायचं.
कबुतरांचा वेग
ही पक्ष्यांची गतीही थक्क करणारी आहे, तब्बल 100 किमी प्रति तास वेगाने ते उडू शकतात आणि 1,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकतात. याशिवाय, त्यांची स्मृतीही प्रबळ असते. ते एकदा कोणतं स्थान लक्षात घेतलं की, कितीही वर्षं झाली तरी त्यांना तो मार्ग विसरायचा नसतो. म्हणूनच ही कबुतरं खऱ्या अर्थानं ‘सुपर पोस्टमन’ होती.