जगभरातील न्यायव्यवस्था वेगवेगळ्या परंपरा, संस्कृती आणि कायद्यानुसार आकार घेतात. काही देशांमध्ये शिक्षा ही फक्त सुधारणा करण्यासाठी असते, तर काही ठिकाणी ती कठोर आणि उग्र स्वरूपाची असते. विशेषतः जेव्हा गोष्ट जीव घेणाऱ्या गुन्ह्यांची येते. नुकतीच भारतातील केरळमधील नर्स, निमिषा प्रिया, हिला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

निमिषावर 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्या हत्येचा आरोप होता. या गुन्ह्याबद्दल 2020 मध्ये तिला येमेनमधील न्यायालयाने मृत्युदंड सुनावला. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिची ही शिक्षा टाळली गेली, परंतु तिचे भविष्य अजूनही धुकट आहे. येमेनमध्ये अशा शिक्षेचे निर्णय शरिया कायद्याच्या आधारावर घेतले जातात. या कायद्यानुसार, पीडिताच्या कुटुंबाने “दिया” म्हणजेच ब्लड मनी भरपाई स्वीकारली, तर दोषीला माफ केलं जाऊ शकतं. मात्र, जर त्यांनी माफी नाकारली, तर फाशी अपरिहार्य होते.
येमेनमधील शिक्षा
येमेनमध्ये मृत्युदंडाची पद्धत थेट आणि भेदक आहे. दोषीला जमिनीवर झोपवून, त्याच्या हृदयावर गोळी झाडली जाते. ही शिक्षा कधी कधी सार्वजनिक ठिकाणी दिली जाते, जेणेकरून इतरांवर परिणाम व्हावा. या घटना केवळ शरीर नव्हे, तर आत्माही हादरवून टाकतात.
येमेनसारख्या देशांसोबतच अजूनही अनेक मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये मृत्युदंड कायदेशीर आहे. अफगाणिस्तान आणि सुदानमध्ये दोषीला फाशी, गोळीबार किंवा कधी कधी दगडाने ठेचून मारले जाते. विशेषतः धर्माशी संबंधित गंभीर गुन्ह्यांबद्दल. या शिक्षा फक्त कायद्याचा भाग नाहीत, तर त्या संबंधित समाजाच्या नीतीमूल्यांशीही जोडलेल्या असतात.
इराण, बांगलादेश, इजिप्त
इराण, बांगलादेश, इजिप्त, कुवेत, सीरिया या देशांमध्ये देखील मृत्युदंड मोठ्या प्रमाणावर दिला जातो. येथे फाशी ही सामान्य शिक्षा आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये गोळीबाराद्वारेही शिक्षा होते. ही पद्धत जलद मृत्यू देण्याच्या हेतूने वापरली जाते आणि अशा शिक्षांचा सार्वजनिकपणे प्रसार करून समाजाला इशारा दिला जातो.
काही देश मात्र या कठोरतेपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मलेशिया याचे उदाहरण आहे. पूर्वी इथेही मृत्युदंड अनिवार्य होता, पण 2023 मध्ये मलेशियन संसदेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला, मृत्युदंड ऐच्छिक करण्यात आला. आता न्यायालयांनाच ठरवायचं असतं की मृत्युदंड द्यायचा की आजन्म कारावास किंवा इतर कठोर शिक्षा. हे पाऊल मानवाधिकार संघटनांच्या दबावामुळे आणि बदलाच्या हवेमुळे उचलण्यात आलं.
सौदी अरेबिया
बहरीनने काही काळ मृत्युदंडावर बंदी घातली होती, पण 2017 नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि आता तिथे पुन्हा फाशी दिली जात आहे. सौदी अरेबियाबद्दल बोलायचं झालं तर, येथील शिक्षा सर्वात जास्त प्रसिद्ध आणि भीषण आहे. तलवारीने सार्वजनिक शिरच्छेद ही तिथली पारंपरिक पद्धत आहे. काही वेळा गोळीबाराद्वारेही शिक्षा होते. शिक्षेचा उद्देश इथे फक्त गुन्हेगाराला शिक्षा देणं नसून समाजाला दाखवणंही असतो की कायदा किती कठोर आहे.