आजच्या घाईगर्दीच्या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकदा औषधांवर अवलंबून असतो. कोणतीही तब्येतीची तक्रार झाली की डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि लगेच औषधे सुरू करतो. पण बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला आहे आणि ही गोष्ट आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. औषधांमध्ये भेसळ झाल्यास आपल्याला आराम मिळण्याऐवजी त्रासच वाढू शकतो. त्यामुळे योग्य औषधाची निवड आणि त्याची शुद्धता ओळखणे ही आजच्या काळात एक अत्यावश्यक गोष्ट बनली आहे.

बनावट औषधी कशी ओळखाल?
बहुतेक वेळा आपण औषधांचे पॅकेज पाहतच नाही. दुकानात मिळाले की घेतो आणि वापरतो. पण औषध खरे आहे की बनावट, हे ओळखण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे त्याचे पॅकेजिंग नीट तपासणे. सील तुटलेली आहे का, नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक आहे का, रंग किंवा छपाईत काही वेगळेपणा जाणवतो का या गोष्टींकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे. अनेकदा बनावट औषधे मूळ उत्पादनासारखीच दिसायला केली जातात, पण काही ना काही त्रुटी नकळत राहून जातात.
आजकाल अनेक औषध कंपन्या आपल्या उत्पादनांमध्ये QR कोड देत असतात, जे स्कॅन केल्यावर औषधाची शुद्धता पडताळता येते. काही वेळा SMS द्वारे सुद्धा औषधाची खात्री करता येते. या सुविधा वापरून ग्राहकांनी औषधाच्या विश्वासार्हतेची खात्री करून घ्यावी. बॅच नंबर आणि एक्सपायरी डेटसुद्धा तपासून घेणं महत्वाचं आहे. पूर्वी वापरलेल्या औषधाच्या पॅकेजिंगसोबत तुलना केली तर खूप गोष्टी लक्षात येतात. तुमच्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशी ती माहिती जुळते का हेही पाहावं.
औषधाचा रंग, आकार किंवा वास यामध्ये काही बदल जाणवला, तर त्याची शक्यता तपासावी. गोळीचा रंग एकसंध आहे का, कॅप्सूल फुटलेली आहे का, त्यातून कोणताही विचित्र वास तर येत नाही ना हे बारकाईने पाहावं. औषधांची ही दृश्य लक्षणेदेखील त्याच्या बनावटपणाचा इशारा देतात.
…तर अन्न आणि औषध प्रशासनास तक्रार करा
बनावट औषधांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही नेहमी अधिकृत आणि परवानाधारक फार्मसीमधूनच खरेदी करा. ऑनलाइन खरेदी करत असाल, तर विश्वासार्ह वेबसाइट्सवरच विश्वास ठेवा. फार कमी किमतीत औषधे मिळत असल्याचं दिसल्यास सावध व्हा. खूप स्वस्त किंमत म्हणजे एखादी अडचण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुम्ही वापरत असलेल्या औषधांचा फोटो सतत ठेवणं आणि जर काही संशयास्पद आढळलं, तर थेट औषध कंपनीला किंवा अन्न आणि औषध प्रशासनास तक्रार करणं ही ग्राहक म्हणून तुमची जबाबदारी आहे.