परीक्षेचा काळ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा तणावपूर्ण टप्पा. अभ्यासाचे तास वाढतात, झोप कमी होते, आणि मनात एकच विचार घोळतो “कसं यशस्वी व्हायचं?” पण फक्त मेहनतीवरच नाही, तर आपल्याभोवतीचं वातावरणही आपल्या यशात मोठी भूमिका बजावतं. वास्तुशास्त्रही हेच सांगतं. योग्य दिशा, सकारात्मक उर्जा आणि थोडी काळजी घेतली, तर अभ्यासात लक्ष लागते, आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत उत्तम निकाल येतो.
अभ्यासाच्या टेबलची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, अभ्यासासाठी घरात योग्य दिशा निवडणं फार महत्त्वाचं आहे. उत्तर किंवा पूर्व ही दिशा एकाग्रतेला पोषक मानली जाते. या दिशेने बसून अभ्यास केल्याने मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. तुमचा टेबल अशा प्रकारे ठेवावा की बसताना चेहरा उत्तर किंवा पूर्वेकडे असावा. टेबलासमोर देवी सरस्वतीचं चित्र, किंवा प्रेरणादायक वाक्य असलेला फ्रेम असेल, तर तो दिवस जरा जास्त ऊर्जावान वाटतो.
क्रिस्टल बॉल किंवा बांबूचे रोप
अभ्यासाच्या टेबलावर काही खास गोष्टी ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. ताज्या पिवळ्या फुलांनी टेबल सजवला, तर सरस्वतीदेवीची कृपा आपल्यावर राहते, असं मानलं जातं. क्रिस्टल बॉल किंवा छोटे बांबूचे रोप देखील उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे.
ईशान्य कोपरा स्वच्छ
घराचा ईशान्य कोपरा ही वास्तुशास्त्रात फार महत्त्वाची जागा आहे. ती अध्यात्म आणि ज्ञानाचं प्रतीक मानली जाते. हा कोपरा नेहमी स्वच्छ, नीटनेटका ठेवणं गरजेचं आहे. या भागात गंगाजल, कापूर आणि सरस्वती यंत्राने सजवलेला कलश ठेवावा. या जागेचं तेज हे तुमच्या विचारांनाही प्रकाशमान करतं.
गणेश मंत्राचा जप
अध्ययन सुरू करण्याआधी मन एकाग्र करण्यासाठी एक छोटा, पण प्रभावी उपाय म्हणजे गणेश मंत्राचा जप. सकाळी अभ्यास सुरू करताना दिवा लावा आणि 11 वेळा “ओम गं गणपतये नम:” असा जप करा. हे मंत्रोच्चार मनातील गोंधळ शांत करतात आणि अडथळे दूर होण्यास मदत करतात. घरात तुळशीचं रोप असणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवा आणि रोज तिला पाणी द्या. यामुळे घरातील उर्जा शुद्ध राहते.
शनिदेवाचा मंत्र
परीक्षेच्या वेळी सतत अपयश येत असेल, अडथळे वाटेत येत असतील, तर शनिवारी काही खास उपाय करायला हरकत नाही. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, आणि शनिदेवाचा मंत्र म्हणत 11 वेळा जप करा. त्या दिवशी गरजूंना काळे चणे, कपडे किंवा लोखंडी वस्तू दान केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतो, असं मानलं जातं.
घरातल्या नैऋत्य कोपऱ्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. ही दिशा स्थैर्य आणि करिअरशी संबंधित असते. त्यामुळे हा भाग स्वच्छ, नीटनेटका आणि ओजस्वी असावा. इथे लाकडी ग्लोब, एखादा पुस्तकांचा स्टँड ठेवल्यास अभ्यासाचे उद्दिष्ट अधिक स्पष्ट होतं आणि तुमचं मन त्या दिशेनं चालू लागतं. पण या भागात कचरा, गोंधळ, किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवणं टाळावं.