रशियात अलीकडेच एक असा कायदा लागू झाला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर काही विशिष्ट शब्द शोधणेसुद्धा आता धोकादायक ठरू शकते. इंटरनेट हे आज जगभर ज्ञान, अभिव्यक्ती आणि संवादाचे सर्वात मोठे साधन असले तरी काही देशांत त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. रशियाने तर त्याच्या एका पाऊलाने जगाला थक्क करून सोडले आहे.
रशियातील नवा कायदा

या नव्या कायद्यामुळे, जर कोणी ‘LGBT movement’ किंवा ‘Nazi’ असे शब्द गुगलवर शोधले, तर त्यांना तब्बल 65 डॉलर्स म्हणजे सुमारे 5,600 रुपये दंड भरावा लागेल. विशेष म्हणजे, केवळ शोध घेतल्याबद्दलही हा दंड लागू होणार आहे. त्या व्यक्तीने काही पोस्ट किंवा शेअर केले असेलच असे नाही. ही कल्पनाही अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकते, पण रशियामध्ये हे आता कायदेशीर वास्तव आहे.
ही कारवाई ‘अतिरेकी’ शब्दाच्या व्याख्येत येणाऱ्या सामग्रीवर केंद्रित आहे. रशियन सरकार LGBT चळवळीसुद्धा अतिरेकी म्हणून ओळखते. त्याचप्रमाणे, अल कायदा किंवा नाझी विचारसरणी यांच्याशी संबंधित कोणताही शोधही यात येतो. सरकारने अशा 5,500 पेक्षा अधिक गट आणि विषयांची यादी तयार केली आहे, आणि ही यादी सतत वाढवली जात आहे. याचा अर्थ, भविष्यात अजूनही अनेक शब्द किंवा गट बंधनाच्या यादीत सामील होऊ शकतात.
VPN वापराल तरीही सुटका नाही
पूर्वी अशा प्रकारच्या शोधांवर कोणतीही कारवाई होत नसे. नागरिक आपले विचार खुलेपणाने मांडत, पोस्ट शेअर करत आणि इंटरनेटचा स्वाभाविक वापर करत. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एखादी व्यक्ती VPN वापरून खाजगी ब्राऊझिंग करत असली तरी ती सुरक्षित राहणार नाही. सरकारने VPN चा वापर सुचवणाऱ्यांवरही लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. व्यक्तीला 2,500 डॉलर्स आणि कंपन्यांना तब्बल 13,000 डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो.
या सर्व गोष्टी रशियन सरकारने एका वेगळ्याच विधेयकात कार्गो कंपन्यांसंबंधीच्या अंतर्भूत करून मंजूर केल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बदल लक्षातही आले नाहीत. सरकार याला युद्धाच्या काळात देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय मानत असले, तरी अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला समजत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी वाढली अडचण
विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण पिढीसाठी ही परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची आहे. इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांमुळे त्यांना कायदेशीर त्रास सहन करावा लागतोय. फक्त शिकण्याच्या उद्देशाने कुणी एखादा शब्द शोधला, तरीही तो शिक्षेस पात्र ठरतो.
या नवीन कायद्यांमुळे रशियातील नागरिक आता अधिकच सावध झाले आहेत. इंटरनेटवरील स्वातंत्र्याचा वापर करताना अनेकजण आता द्विधा मनःस्थितीत आहेत. जग भरात जिथे माहितीचा खुलेपणा आणि अभिव्यक्तीची मोकळीक वाढते आहे, तिथे रशियात मात्र ती हळूहळू बंदिस्त केली जात आहे.