अंतराळ… या शब्दातच एक जादू आहे. अनंत अशा आकाशात माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर गाठलेले टप्पे आपल्याला थक्क करून टाकतात. परंतु या अद्भुत प्रवासामागे किती अफाट खर्च येतो, हे बऱ्याचदा आपल्याला माहितीच नसतं. काही देशांनी अंतराळात पाऊल टाकण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, तर भारतासारख्या देशाने मर्यादित साधनसंपत्ती असूनही केवळ शिस्त, काटकसर आणि जिद्द यांच्या बळावर इतिहास रचला. आज आपण अशाच काही जगातील सर्वात महागड्या आणि सर्वात स्वस्त अंतराळ मोहिमांविषयी जाणून घेणार आहोत.
ISS स्थान

सर्वांत महागड्या मोहिमांबद्दल बोलायचं झालं, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS हे त्यात अग्रेसर आहे. एकट्या NASA ने नव्हे, तर अमेरिका, रशिया, युरोप, जपान आणि कॅनडाच्या अवकाश संस्थांनी मिळून हा प्रकल्प उभारला आहे. तब्बल 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तयार झालेल्या या स्थानकावर सुमारे $150 ते $160 अब्ज इतका खर्च झाल्याचे सांगितले जाते. हे केवळ एक मिशन नसून मानवी बुद्धीचा शिखर बिंदू आहे.
NASA चा स्पेस शटल प्रोग्राम
त्यानंतर येतो NASA चा स्पेस शटल प्रोग्राम, जो 1981 ते 2011 या कालावधीत राबवण्यात आला. यासाठी सुमारे $133 अब्ज खर्च झाला. या शटल्सनी 135 मोहिमा पूर्ण करत अंतराळ अभ्यासाला नवी दिशा दिली. याच काळात अनेक प्रयोगशाळा, उपग्रह आणि उपकरणे अवकाशात पोहोचवण्यात आली.
तिसरं महत्त्वाचं मिशन म्हणजे अपोलो प्रोग्राम ज्यामुळे पहिल्यांदाच माणूस चंद्रावर पाऊल ठेवू शकला. 1961 ते 1972 दरम्यान राबवलेल्या या योजनेसाठी त्या काळात $25 अब्ज खर्च झाले होते, जे आजच्या हिशेबाने जवळपास $257 अब्ज होते. हा एक धाडसी प्रयोग होता, ज्याने “आपण काहीही करू शकतो” या विचाराला बळ दिलं.
ISRO च्या मोहीमा
आता स्वस्त आणि अद्वितीय मोहिमांविषयी बोलायचं झालं, तर भारताने यामध्ये खूप मोठा ठसा उमटवला आहे. मंगळयान, म्हणजेच ISRO चे मार्स ऑर्बिटर मिशन हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य होते. 2013 मध्ये केवळ ₹450 कोटी म्हणजेच $74 दशलक्ष डॉलर्समध्ये ही मोहीम यशस्वी करण्यात आली. विशेष म्हणजे, मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, ज्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं.
याच मोहिमेची आणखी एक खासियत म्हणजे त्याचा खर्च हॉलिवूड चित्रपट ‘ग्रॅव्हिटी’ पेक्षाही कमी होता. ही गोष्ट आजही लोक गर्वाने सांगतात की आपण कमी खर्चात मोठं स्वप्न पूर्ण करू शकतो. ISRO च्या शास्त्रज्ञांची मेहनत, तंत्रज्ञानातील कल्पकता आणि देशांतर्गत संसाधनांचा योग्य वापर यामुळे हे शक्य झालं.
यानंतर येते चांद्रयान-3 मोहिम. 2023 मध्ये भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला. या योजनेचा खर्चही केवळ $75 दशलक्ष होता. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून महत्त्वाचा वैज्ञानिक डेटा मिळाला, जो भविष्यातील संशोधनाला दिशादर्शक ठरणार आहे.
NASA च्या स्वस्त मोहीमा
NASA नेदेखील काही कमी बजेटमधील यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत. 2013 मध्ये लाँच झालेलं LADEE मिशन हे त्याचं उदाहरण. याचा उद्देश चंद्राच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणं होता आणि यासाठी सुमारे $280 दशलक्ष खर्च आला होता. तुलनेने स्वस्त, पण तितकंच प्रभावी असलेलं हे मिशनही खूप महत्त्वाचं ठरलं.