आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, पण पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे जिथे माणसाने पाय ठेवणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला मिठी मारण्यासारखं आहे. एका छोट्याशा बेटावर, अटलांटिक महासागराच्या कुशीत लपलेलं, हजारो विषारी सापांचा अड्डा आहे, जिथे जमिनीचा प्रत्येक इंच मृत्यूने व्यापलेला आहे. या बेटाचं नाव आहे ‘स्नेक आयलंड’ आणि त्याच्या भयानकतेमागे असलेली खरी गोष्ट जितकी भीतीदायक आहे, तितकीच ती निसर्गाच्या गुंतागुंतीच्या सूत्रांची आठवण करून देणारीसुद्धा आहे.

ब्राझीलमधील ‘स्नेक आयलंड’
ब्राझीलच्या साओ पाउलो शहरापासून सुमारे 33 किलोमीटर दूर असलेलं इल्हा दा क्विमाडा ग्रांडे हे बेट, म्हणजेच स्नेक आयलंड, हे फक्त 43 हेक्टर एवढंच आहे, पण त्यात वसलेले जीव जगात कुठेही सापडत नाहीत. इथे 2,000 ते 4,000 दरम्यान ‘गोल्डन लान्सहेड व्हायपर’ नावाचे अतिविषारी साप राहतात. या सापांचं विष इतकं प्रबळ आहे की चावल्यावर केवळ एक तासात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच, ब्राझील सरकारने इथे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला पाऊलही ठेवण्याची परवानगी दिलेली नाही.
या बेटाची भीती इतकी तीव्र आहे की, काही भागांत तर प्रत्येक चौरस मीटरला एक साप सापडतो. हे साप झाडांवर चढून स्थलांतरित पक्ष्यांची वाट पाहतात आणि त्यांच्या शरीरात विषाचा मारा करताना एकही क्षण वाया घालत नाहीत. या विषाचा परिणाम इतका भयंकर असतो की मूत्रपिंड निकामी होणं, अंतर्गत रक्तस्त्राव, आणि स्नायूंचं सडणं हे सगळं काही मिनिटांत घडू शकतं. यामुळेच या बेटावर जर कुणाला काही झालं, तर तिथून बाहेर येणं जवळजवळ अशक्य असतं.
हे साप इथे एवढ्या संख्येने आणि इतके घातक कसे झाले, यामागेही एक उत्क्रांतीची विलक्षण कहाणी आहे. सुमारे 11,000 वर्षांपूर्वी, समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे हे बेट मुख्य भूमीपासून वेगळं झालं. त्यावेळी इथे असलेले साप कदाचित जराराका प्रजातीचे इथे अडकले आणि काळाच्या ओघात ते पूर्णपणे वेगळे विकसित झाले. जमिनीवर भक्षक नव्हते, आणि भक्ष्यही फारसं नव्हतं. म्हणून त्यांनी स्थलांतरित पक्ष्यांवर शिकारीस सुरुवात केली, आणि त्यानुसार त्यांचं विष अधिक तीव्र झालं इतकं की शिकार उडण्याआधीच खाली पडून मरते.
गोल्डन लान्सहेड साप
या बेटावर आढळणाऱ्या गोल्डन लान्सहेड सापांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं विष मुख्य भूमीवरील त्याच प्रजातीच्या सापांपेक्षा तब्बल 5 पट अधिक प्रबळ आहे. याचं कारण हे की, त्यांना पक्ष्यांना अगदी लगेच मारून टाकावं लागतो, अन्यथा पक्षी उडून जातात. या उत्क्रांतीमुळे त्यांचं विष आता विज्ञानातही अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे.
हो, हे विष फक्त जीवघेणं नाही, तर जीव वाचवणारंही बनू शकतं. साओ पाउलो येथील बुटांटन इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ या विषाचा वापर हृदयविकार, रक्त गाठी आणि इतर गंभीर आजारांवर औषध बनवण्यासाठी संशोधन करत आहेत. भविष्यात हेच विष हजारो, लाखो लोकांचे प्राण वाचवू शकतं. त्यामुळेच, हे बेट आणि त्यावर राहणाऱ्या सापांचं अस्तित्व टिकवणं हे मानवतेसाठीही तितकंच आवश्यक आहे.
50 टक्क्यांनी घटली सापांची संख्या
पण दुर्दैवाने, हे साप आता स्वतःच धोक्याच्या छायेखाली आहेत. गेल्या 15 वर्षांत त्यांच्या संख्येत सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली आहे. यामागे कारणं आहेत बेकायदेशीर तस्करी, अधिवास नष्ट होणं, आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट. काळ्या बाजारात या सापांची किंमत 10,000 ते 30,000 डॉलर्सच्या आसपास असते. हे लक्षात घेता, तस्करांनीही त्यांच्यावर डोळा ठेवलेला असतो.
या पार्श्वभूमीवर, ब्राझील सरकारने स्नेक आयलंडवर सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कडक बंदी घातलेली आहे. इथे फक्त शास्त्रज्ञच, तेही विशेष परवानगी, डॉक्टर, आणि विष प्रतिबंधक औषधं घेऊन जाऊ शकतात. ब्राझिलियन नौदल वर्षातून एकदाच दीपगृहाच्या देखभालीसाठी इथे जातं आणि तोही प्रवास जीवावर बेतणारा असतो.