भारतीय ग्रामीण जीवनातील एक अविभाज्य घटक असलेल्या विहिरी अनेक गावांमध्ये अजूनही पाण्याचा प्रमुख स्रोत आहेत. विहिरींना आपण अनेकदा एकाच विशिष्ट आकारात पाहतो त्या म्हणजे गोल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या विहिरी नेहमी गोलच का असतात? का त्या चौरस, आयताकृती किंवा त्रिकोणी बनवत नाहीत? हे केवळ रचनात्मक सुलभता नसून, त्यामागे खोलवर विज्ञान आणि नैसर्गिक तर्क दडलेला आहे.

विहिरींचा गोल आकारच का?
विहिरींचा गोल आकार हा विज्ञानाच्या सिद्धांतांवर आधारित आहे. जेव्हा पाण्याने विहीर भरलेली असते, तेव्हा तिच्या भिंतींवर चारही दिशांनी समान दाब निर्माण होतो. जर ही विहीर चौरस किंवा त्रिकोणी असती, तर त्या कोपऱ्यांवर जास्त दाब पडून तेथे भेगा पडण्याची शक्यता वाढली असती. मात्र गोल भिंतींमध्ये हा दाब सर्वत्र एकसमान पसरतो, ज्यामुळे ती अधिक स्थिर आणि सुरक्षित राहते.
माती आणि दगडांचा नैसर्गिक दबाव देखील गोल रचनेत प्रभावीपणे समतोल ठेवला जातो. गोल विहिरीच्या भिंती हे ओघानेच त्या दबावाला तोंड देतात. म्हणूनच त्या दीर्घकाळ दुरुस्तीशिवाय टिकतात. ही रचना इतकी प्रभावी आहे की आजही अनेक जुन्या विहिरी आपल्या मूळ स्थितीत मजबूत उभ्या आहेत.
स्वच्छता आणि इतर कारणे
गोल विहिरीमधून पाणी काढणंही अतिशय सोपं असतं. बादली कोणत्याही दिशेने टाकली तरी ती सरळ पाण्यात जाते आणि सहज बाहेर काढता येते. याशिवाय, गोल विहिरी स्वच्छ ठेवणं सोपं असतं कारण त्यात कोपरे नसल्याने घाण साचत नाही. चौकोनी विहिरींमध्ये कोपऱ्यांमध्ये मळ साचून पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते, जी गोल विहिरीत टाळता येते.
याचबरोबर, जेव्हा खोल जमिनीवर विहीर खोदली जाते, तेव्हा तिचा आकार हळूहळू नैसर्गिकरित्या गोल होत जातो. हे केवळ मानवनिर्मित निर्णय नसून, जमिनीच्या घटकांमुळे स्वतःच आकार असा घेतो. त्यामुळे गोल विहिरींची ही रचना मानव आणि निसर्गाच्या परस्परसामंजस्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.