जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की त्याच्या तंत्रज्ञान आणि सैन्यशक्तीच्या जोरावर कोणताही शत्रू झेप घेण्याआधीच जमीनदोस्त होतो. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने केवळ पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही, तर त्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण तंत्रज्ञानाने जगभरात आपली खरी ताकद सिध्द केली. ब्रह्मोस आणि S-400 सारखी प्रणाली केवळ सामरिक बल नसून, भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतिक बनली आहे.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र
या कारवाईत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते भारत-रशिया संयुक्त भागीदारीत विकसित झालेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राने. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र केवळ वेगवान नाही, तर अचूकही आहे. त्याचा वेग ध्वनीच्या तुलनेत तब्बल 3 पट अधिक आहे, मॅक 2.8 ते 3.0.
इतक्या प्रचंड वेगाने झेपावणाऱ्या क्षेपणास्त्राला पकडणं तर दूर, ते रडारवर दिसण्याआधीच शत्रूचा नाश करते. त्याचं ‘समुद्र-स्किमिंग’ आणि ‘भू-आलिंगन’ उड्डाण तंत्र हेच दाखवतं की, आधुनिक युद्धशास्त्रात भारत केवळ स्पर्धक नाही, तर आघाडीवर आहे.
ब्रह्मोसचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचा 360 अंशांमधून हल्ला करण्याचा क्षमतेचा वापर. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, युद्धनौकेवरून, आणि आता तर विमानांतूनही डागता येतं. म्हणजे, कुठल्याही दिशेने आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून हे भेदक अस्त्र शत्रूवर हल्ला करू शकतं. आणि त्याचा अचूकतेचा दर आहे तब्बल 95 टक्के, जो युद्धात निर्णायक फरक घडवून आणतो.
S-400
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने जेव्हा शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली, तेव्हा S-400 आणि आकाश प्रणालींनी आकाशातून येणाऱ्या प्रत्येक धोक्याला क्षणार्धात नष्ट केलं. या हवाई संरक्षण प्रणालींच्या सामर्थ्यामुळे भारताचं संरक्षण कवच इतकं मजबूत झालं की पाकिस्तानला कोणतेही प्रतिउत्तर देण्याचीही संधी मिळाली नाही.