भारतीय संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल टाकण्यात आलं आहे. शत्रूच्या हालचाली आकाशातच पकडणाऱ्या आणि धोका निर्माण होण्याआधीच त्यावर लक्ष ठेवणाऱ्या अव्वल दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आता भारतातच विकसित केली जाणार आहे. ‘अवॅक्स इंडिया’ या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताने केवळ एक प्रकल्प सुरु केला नसून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे.

AWACS India प्रकल्प
या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाल्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत क्रांतिकारी वाढ होणार आहे. 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत 6 अत्याधुनिक एअरबोर्न वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टीम तयार करण्यात येणार आहेत. या प्रणालींमुळे शत्रूच्या हालचाली अगदी दूरवरूनही टिपता येणार आहेत. ही विमाने केवळ आकाशात उड्डाण करणारी यंत्रणा असणार नाहीत, तर ती ऑपरेशनल कंट्रोल सेंटरसारखी भूमिका बजावतील, जी युद्धस्थितीत त्वरित निर्णय घेण्यास मदत करतील.
या प्रकल्पात एअर इंडियाच्या जुन्या A321 विमानांमध्ये संरचनात्मक बदल करून त्यांना युद्धपातळीवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यामध्ये एक मोठा डोर्सल फिन बसवण्यात येणार आहे, जो संपूर्ण 360 अंश रडार कव्हरेज प्रदान करेल. याशिवाय, अत्याधुनिक AESA रडारही या विमानांमध्ये समाविष्ट केले जाईल, जे अत्यंत अचूक आणि गतिमान माहिती मिळवण्याची क्षमता ठेवतात.
3 वर्षांत तयार होणार विमाने
सध्या भारतीय हवाई दलाकडे इस्रायल व रशियाची बनवलेली फाल्कन प्रणाली आणि डीआरडीओची नेत्रा प्रणाली वापरली जाते. परंतु त्या तुलनेत अवॅक्स इंडिया प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नव्या प्रणाली अधिक सक्षम, टिकाऊ आणि पूर्णपणे स्वदेशी असतील. त्यामुळे भारताची परावलंबित्वाची साखळी तोडत, संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारत एक ठाम पाऊल टाकत आहे.
या सहाही विमानांची निर्मिती पुढील 3 वर्षांच्या आत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकदा ही विमाने हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली, की शत्रूच्या कोणत्याही गुप्त हालचाली नजरेतून सुटणार नाहीत. त्याच वेळी, संकटाच्या क्षणी या प्रणालींमुळे युद्धस्थितीत द्रुत आणि अचूक निर्णय घेणं शक्य होईल.