सोनं, चांदी आणि हिरे या मौल्यवान वस्तूंचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर लक्झरी आणि श्रीमंतीचं चित्र उभं राहतं. पण तुम्हाला माहिती आहे का, निसर्गात एक असं झाड आहे ज्याच्या लाकडाची किंमत हिऱ्यांपेक्षाही अधिक असते? होय, हे खरं आहे! हे लाकूड म्हणजे अगरवुड, ज्याला औद असंही म्हणतात. एक किलो अगरवुडची किंमत कधी कधी 1 लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक असते. हे लाकूड इतकं दुर्मिळ आणि मौल्यवान का मानलं जातं यामागे अनेक थरारक कारणं आहेत.

अगरवुडचे झाड
अगरवुड म्हणजे नेमकं काय? हे Aquilaria नावाच्या झाडापासून मिळतं. या झाडाला जेव्हा विशिष्ट प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग होतो, तेव्हा त्याच्या लाकडात एक अत्यंत सुगंधी रेझिन तयार होतं. हाच रेझिनयुक्त भाग म्हणजे अगरवुड, जो संपूर्ण जगात परफ्यूम उद्योगात अत्यंत लोकप्रिय आहे. पण ही नैसर्गिक प्रक्रिया 15-20 वर्षं घेते, म्हणूनच हे लाकूड अत्यंत दुर्मिळ आणि महाग आहे.
आज जगभरात विशेषतः इस्लामिक देशांमध्ये, औद परफ्यूमला विलासिता आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. अरब देशांमध्ये औद परफ्यूमचा वापर लग्नसमारंभ, धार्मिक विधी आणि राजघराण्यांच्या परंपरेत मोठ्या प्रमाणावर होतो. त्याच्या खोल, गूढ आणि शाश्वत सुगंधामुळे त्याला इतर कोणत्याही परफ्यूमशी तुलना करता येत नाही.
अगरवुडचे फायदे
पण याचा उपयोग केवळ सुगंधापुरता मर्यादित नाही. अगरवुडचे तेल, धूप, आयुर्वेदिक औषधं आणि ध्यानधारणेसाठी देखील वापरलं जातं. आयुर्वेदात अगरवुडचा वापर तणाव दूर करणे, निद्रानाश कमी करणे आणि पचन सुधारण्यासाठी केला जातो.
आज अगरवुड भारत, मलेशिया, थायलंड, लाओस आणि इंडोनेशिया या देशांमध्ये फार कमी प्रमाणातच आढळतो. यामुळेच त्याचं संवर्धन हे मोठं आव्हान ठरतंय. बेकायदेशीरपणे झाडांची तोड होत असल्याने, ही झाडं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सरकार आणि पर्यावरण संस्थांकडून संवर्धनासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.