आजच्या धावपळीच्या जीवनात जसं वेळेचं व्यवस्थापन गरजेचं आहे, तसंच पैशांचं व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. अनेकजण चांगला पगार मिळवतात, पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात शिल्लक राहतं ते फक्त चिंता आणि टेन्शन. कारण एकच पैसे मिळतात, पण ते जातात कुठे हे कळतच नाही. आणि हीच जागरूकतेची पहिली पायरी आहे. आपले पैसे आपण कुठे आणि कसे खर्च करतो, याचा नेमका हिशेब ठेवणं.

खरं तर, बचत ही श्रीमंतीकडे नेणारी पहिली वाट आहे. वॉरेन बफेटसारखे मोठे गुंतवणूकदारही याच गोष्टीवर भर देतात. कमावण्यापेक्षा महत्त्वाचं आहे, कमावलेले जपणं. आणि त्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे आपल्या आर्थिक प्रवाहाचं योग्य विभाजन करणं. यासाठी अनेक आर्थिक तज्ज्ञ 3 बँक खाती ठेवण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ बसवणं सोपं होतं.
उत्पन्नाचं खातं
पहिलं खातं असतं उत्पन्नाचं म्हणजे तुमचा पगार ज्यामध्ये जमा होतो ते. हे खातं फक्त तुमच्या मासिक गरजा पूर्ण करण्यापुरतंच वापरावं, जसं की घरभाडं, ईएमआय, वीजपाणी बिलं, आणि रोजच्या खर्चासाठी आवश्यक रक्कम. बाकीचे पैसे तिथून लगेच इतर दोन खात्यांमध्ये विभागून टाकले, तर अनेक अनावश्यक खर्च टाळता येतात आणि तुमचा वैयक्तिक खर्च एका ठरावीक मर्यादेत राहतो.
आपत्कालीन खातं
दुसरं म्हणजे आपत्कालीन खातं. या खात्याचं महत्व तेव्हाच कळतं, जेव्हा आयुष्यात अचानक काहीतरी अनपेक्षित घडतं. एखादा आजार, नोकरी जाणं किंवा कुठलीही संकटं. अशा वेळी या खात्यात साठवलेली रक्कम तुम्हाला आधार देऊ शकते. दरमहा पगारातून थोडीशी रक्कम बाजूला काढून या खात्यात टाकली, तर काही महिन्यांतच चांगली बचत तयार होते. आर्थिक सुरक्षिततेसाठी किमान 6 ते 8 महिन्यांच्या गरजा भागवेल इतका निधी इथे असणं गरजेचं आहे.
गुंतवणूक खातं
आणि शेवटचं गुंतवणूक खातं. इथूनच तुमचे SIP, म्युच्युअल फंड, विमा हप्ता, किंवा इतर दीर्घकालीन योजना सुरु होतात. प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम इथून वजा झाली की तुम्ही गुंतवणुकीचं शिस्तबद्ध नियोजन करू शकता. आज छोट्या रकमांनी सुरुवात केली, तरी कालांतराने ती मोठ्या स्वरूपात परत येऊ शकते.
या 3 खात्यांच्या व्यवस्थेचा फायदा म्हणजे केवळ आर्थिक साक्षरता वाढत नाही, तर जीवनात अनेक गोष्टी साध्य करणं सोपं होतं. घर, गाडी, दागदागिने, मुलांचं शिक्षण, किंवा निवृत्तीनंतरचं आयुष्य हे सगळं तुम्ही ठराविक नियोजनानं सहज साध्य करू शकता. मुख्य म्हणजे, पैशासाठी कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही.