Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित केले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील चार शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. यातील तीन शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी पूर्ण झाली असून एका शाळेतील ओपन सायन्स पार्कची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.
प्रत्येकी 20 लाख रुपयांच्या खर्चातून शाळेमध्ये सायन्स पार्कची उभारणी केली जात असून या वीस लाखांचा खर्चापैकी दहा लाख रुपयांचा खर्च ग्रामपंचायतच्या सहभागातून केला जात आहे.

सायन्स पार्कच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच ग्रहमाला समजून घेता येते. या उपक्रमाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शाळेमध्येच चंद्रयान, सूर्यमाला, रॉकेट, वैज्ञानिकांची माहिती अन त्यांनी लावलेले शोध इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. यात विद्यार्थ्यांना जवळपास 23 प्रकारची उपकरणे पाहता येतात. यामुळे या संबंधित शाळांना पंचक्रोशीतील इतर शाळांचे विद्यार्थी देखील भेटी देतात.
या शाळांमध्ये विकसित झालेत सायन्स पार्क
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, पारनेर तालुक्यातील पानोली, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी आणि शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित होत आहेत.
दरम्यान या चार पैकी सारोळा कासार, संवत्सर, पानोली आणि काष्टी या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सायन्स पार्कचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित शाळेतील म्हणजेच कोळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सायन्स पार्कचे काम सुरू आहे. हे सायन्स पार्क ज्या ग्रामपंचायतींनी 50 टक्के निधी देण्याची तयारी दाखवली आहे त्याच गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत विकसित होत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी 5 शाळांमध्ये तयार होणार सायन्स पार्क
अहिल्यानगर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी सायन्स पार्क उपक्रमाबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जिल्हा परिषदेकडून सायन्स पार्क उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
दरम्यान या 50 लाख रुपयांच्या तरतुदीतून आणखी पाच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे पाच ग्रामपंचायतीकडून 50 लाख रुपयांचा निधी उभारला जाणार आहे. म्हणजे टोटल एक कोटी रुपयांच्या खर्चातून जिल्ह्यातील आणखी पाच शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित होतील.
यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले असून ज्या ग्रामपंचायतकडून सगळ्यात आधी प्रस्ताव पाठवला जाईल त्या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा यासाठी विचार केला जाईल असे सुद्धा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.