कोमा म्हणजे फक्त बेशुद्धावस्था नाही, तर ती एक अशी खोल, अनाकलनीय शांतता असते जिथे शरीर जणू वेळेत अडकून पडलेले असते. कोणताही आवाज, प्रकाश, वेदना… या सगळ्या गोष्टींना शरीर काहीच प्रतिसाद देत नाही. रुग्ण दिसतो जिवंत, पण त्याच्या डोळ्यांमागे असते एक खोल अनुत्तरता. अशा वेळी जवळच्यांसाठी प्रत्येक दिवस हा आशा आणि चिंतेमधला संघर्ष ठरतो.

अलीकडे सौदी अरेबियाचा ‘झोपेतील राजकुमार’ म्हणून ओळखला जाणारा मुलगा 20 वर्षांच्या खोल कोमानंतर निधन पावल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला, कोमामध्ये शरीरात नेमकं काय घडतं? आणि इतक्या काळ कोमामध्ये राहिलेलं शरीर जिवंत तरी कसं राहतं?
‘कोमा’ ही स्थिती नेमकी कशी असते?
कोमा ही एक अत्यंत गंभीर वैद्यकीय स्थिती असते. यात मेंदू चेतना गमावतो आणि व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देत नाही. आपण झोपेत असतो तेव्हा काही वेळाने जाग येते, पण कोमामध्ये मेंदूतील ती चेतना जागंच होत नाही. तरीही, शरीर श्वास घेतं, हृदय धडधडतं, पण केवळ मशीनच्या मदतीने.
या अवस्थेमध्ये मेंदूच्या आतल्या Reticular Activating System आणि इतर संवेदनक्षम भाग काम करणं थांबवतात. त्यामुळे EEG वर मेंदूतील हालचाल अत्यंत मंद असते. काही मूलभूत क्रिया जसं की श्वास घेणं ही मेंदूच्या तळाशी असलेल्या भागामार्फत चालू राहतात. पण उरलेली मेंदूची क्रियाशीलता थांबलेली असते.
शरीराच्या विविध प्रणालींवर त्याचा परिणाम दिसतो. श्वसन प्रणाली अशक्त होते, अनेकदा रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते. रक्तदाब अनियमित होतो, आणि मेंदूमध्ये सूज, रक्तस्त्राव किंवा झटके यामुळे इतर अवयवांवरही दबाव येतो. स्नायू सुस्त होतात, हालचाल पूर्णपणे थांबते. कधी कधी डोळे मिचकावणे किंवा वेदनेला झटका देणे असे काही मूलभूत प्रतिक्षेप दिसू शकतात, पण त्या पलिकडे काहीच हालचाल होत नाही.
या अवस्थेत रुग्ण खूप नाजूक होतो. त्याला पल्मोनरी इन्फेक्शन, मूत्रमार्गाच्या संसर्ग, बेडसोर्स, रक्ताच्या गाठी यांसारख्या गुंतागुंतीपासून वाचवण्यासाठी विलक्षण काळजी घेणं आवश्यक असतं.
कोमात जाण्याची कारणे
कोमाच्या मागे अनेक कारणं असू शकतात. डोक्याला झालेली जबर दुखापत, स्ट्रोक, मेंदूतून रक्तस्त्राव, श्वासोच्छ्वास थांबणे, पाण्यात बुडणे, किंवा हृदयक्रिया थांबणे यामुळे मेंदूत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि कोमा येऊ शकतो. याशिवाय काही संक्रमणं जसं की मेनिंजायटीस किंवा एन्सेफलायटीस, अतिशय कमी किंवा जास्त साखर, औषधांचे दुष्परिणाम किंवा विषारी घटक ही देखील कारणीभूत ठरू शकतात.
डॉक्टर्स रुग्णाची स्थिती समजून घेण्यासाठी ग्लासगो कोमा स्केल (GCS) चा उपयोग करतात, ज्यामध्ये डोळे उघडण्याची क्षमता, बोलण्याची प्रतिक्रिया आणि शरीराच्या हालचाली तपासल्या जातात. त्यानंतर CT, MRI, EEG आणि रक्त तपासण्यांद्वारे कोमाचं नेमकं कारण शोधलं जातं.
उपचार पद्धती
उपचारामध्ये सुरुवातीला मेंदूला सूज कमी करण्यावर, ऑक्सिजन आणि पोषण देण्यावर आणि संक्रमण रोखण्यावर भर दिला जातो. काही वेळा डॉक्टर जाणूनबुजून रुग्णाला औषधांच्या साहाय्याने कोमामध्ये ठेवतात, म्हणजे मेंदूवरचा ताण कमी होईल. अशा वेळी मेंदूला ‘विराम’ दिला जातो आणि ही विश्रांती त्याच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची ठरते.
पण बरे होण्याचा प्रवास अनिश्चित असतो. काही रुग्ण काही आठवड्यांत शुद्धीवर येतात, तर काही महिने किंवा वर्षानुवर्षं कोमामध्येच राहतात. वेळ, प्रेम, निगा आणि योग्य वैद्यकीय उपचार यांच्या सहाय्यानेच या अवस्थेतून परत येणं शक्य असतं.