अजितदादांच्या ‘या’ शिलेदाराची मंत्रिमंडळात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ! कोकाटे यांची रिप्लेसमेंट म्हणून अहिल्यानगरला आणखी एक मंत्रीपद ?

अहिल्यानगर जिल्ह्याला आणखी एका मंत्रिपदाची भेट मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पक्षाच्या लोकप्रिय आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Published on -

Ahilyanagar News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. खरेतर, वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे नेहमीच बातम्यांमध्ये राहतात. पण, यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे मंत्रीपद गाजवणारे कोकाटे यांचे ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ हे प्रकरण सध्या जोरदार गाजत आहे.

त्याच झालं असं मंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान चक्क सभागृहात जंगली रमी खेळताना दिसलेत. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वायरल झाला. यानंतर विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला घेरले जात आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्याबाबत पक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे म्हणत एक सूचक इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील सोमवारी – मंगळवारी त्यांचे ( मंत्री माणिकराव कोकाटे ) म्हणणे ऐकून घेवू व त्यानंतर निर्णय घेऊ असे म्हटले आहे. अशातच आज रविवार, 27 जुलै 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

यामुळे जर मंत्री माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय झाला, अजितदादांनी भाकरी फिरवण्याचे ठरवले अन कृषी मंत्री कोकाटे यांचा पक्षाने राजीनामा घेतला तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाट्याला कृषी खाते मिळू शकते अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे या शर्यतीत पुढे आहेत.

खरंतर ज्यावेळी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी आशुतोष काळे यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान आता मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला तर आशुतोष काळे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते आणि त्यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला आणखी एक मंत्री पदाची भेट मिळेल अशी आशा सर्वसामान्य नगरकरांची आणि कोपरगावकरांची आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण होणार

वास्तविक, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. अहिल्यानगर जिल्ह्यात आशुतोष काळे यांचे मताधिक्य सर्वाधिक पाहायला मिळाले. काळे हे एक उच्चशिक्षित शांत आणि संयमी स्वभावाचे राजकारणी आहेत.

परफेक्ट पॉलिटिशियनचे सर्व गुण त्यांच्यात आहेत. नेहमीच मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार राहिले आहेत. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. असे असताना सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती योग्यरीत्या पार पाडली आहे.

त्यांनी शिर्डी येथे दोनदा संपन्न झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरांचे नियोजन केले. महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये   काळे यांचे नाव सुद्धा आघाडीवर असते.

म्हणूनच अजितदादा यांनी जर कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. दरम्यान, आज अजित दादा पवार अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि म्हणूनच या दौऱ्यात आशुतोष काळे यांच्या नावावर शिकामोर्तब होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!