न विराट कोहली, न धोनी…’हा’ आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! अंबानींचं अँटिलिया त्याच्या महालापुढे काहीच नाही

Published on -

क्रिकेट म्हटलं की भारतात चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडतो. मैदानात खेळणारे क्रिकेटपटू हे केवळ खेळाडू नसून चाहत्यांच्या नजरेत देवासारखे असतात. अशा या लोकप्रिय खेळामध्ये यशस्वी खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी, पैसा आणि मान-सन्मान यांची सीमा कुठेच नसते. पण तुम्हाला माहितीय का, भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण आहे? तुमचं उत्तर जर सचिन, धोनी किंवा विराट असेल, तर तुम्ही चुकताय.

समरजीत सिंह गायकवाड

या यादीत अव्वल स्थानावर आहे एक माजी क्रिकेटपटू समरजीत सिंह गायकवाड. त्याने फारशी आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवलेली नाही, पण त्याचं नाव आजही चर्चेत असतं, आणि त्याचं कारण आहे त्याचं अब्जावधींचं वैभव आणि आलिशान जीवनशैली.

समरजीत सिंह यांचा जन्म 25 एप्रिल 1967 रोजी एका प्रतिष्ठित राजघराण्यात झाला. वडील रमणजीतसिंह प्रतापसिंह गायकवाड हे बडोद्याचे महाराजा होते आणि आई शुभांगी राजेही राजघराण्याशी संबंधित होत्या. समरजीत सिंह यांना त्यांच्या वडिलांकडून अपार संपत्ती आणि वारसा लाभला, ज्यामुळे ते केवळ क्रिकेटपटू नव्हते, तर भारतातील एक प्रतिष्ठित राजघराण्याचे उत्तराधिकारीही ठरले.

क्रिकेट कारकीर्द

त्यांची क्रिकेट कारकीर्द फार मोठी नव्हती, त्यांनी केवळ 6 रणजी सामने बडोद्याच्या संघासाठी खेळले, ज्यात त्यांनी एकूण 119 धावा केल्या. पण त्यांचा खेळाबद्दलचा उत्साह मात्र कायम राहिला. त्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आणि मोतीबाग स्टेडियममध्ये एक उत्कृष्ट क्रिकेट अकादमी सुरू केली, जी नवोदित खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहे.

पण ज्यामुळे समरजीत सिंह सर्वात चर्चेत आले, ती गोष्ट म्हणजे त्यांचं वास्तव्य असलेलं लक्ष्मी विलास पॅलेस. हा राजवाडा केवळ भारतातलं नव्हे, तर जगातलं सर्वात मोठं खासगी निवासी घर मानलं जातं. हे घर इतकं भव्य आहे की मुंबईतील अंबानींचं अँटिलिया देखील याच्या तुलनेत लहान भासतं. लक्ष्मी विलास पॅलेसचं क्षेत्रफळ बकिंगहॅम पॅलेसपेक्षा देखील मोठं असून, यामध्ये 170 खोल्या, खास दरबार हॉल, आणि इटालियन संगमरवरी सजावट आहे.

एकूण संपत्ती किती?

2012 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर समरजीत सिंह यांना बडोद्याचा महाराजा म्हणून जाहीर करण्यात आलं आणि 2013 मध्ये त्यांनी वारशाने कुटुंबाची मालमत्ता स्वीकारली. अनेक अहवालांनुसार, आज त्यांची एकूण संपत्ती 25,000 कोटी रुपयांहून अधिक आहे, ज्यामुळे ते केवळ सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूच नव्हे, तर भारतातील काही अत्यंत श्रीमंत व्यक्तींमध्येही गणले जातात.

खेळाडू म्हणून ते फारसे गाजले नसले तरी त्यांचं वैभव, इतिहास आणि वारसा यामुळे समरजीत सिंह हे आजही एक लक्षवेधी व्यक्तिमत्त्व ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!