अहिल्यानगर : अहिल्यानगर ते सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात पानटपरी चालकाला सिगारेटचे पाकिट घेवून बनावट नोटा देणाऱ्यास नगर तालुका पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात तिसगाव, वाळूज, जि. छत्रपती संभाजीनगर येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्यामध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
तीन ते चार वर्षांपासून हा कारखाना सुरू होता. त्यात सात जणांना अटक करून त्यांच्याकडून ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा तर, २७ लाख ९० हजार ६०० रुपयांचे प्रिटिंग मशिन, संगणक, असा ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २ कोटी १६ लाखांचा बनावट नोटांचा कागद व शाई हस्तगत केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

निखील शिवाजी गांगर्डे (वय २७ रा. कोंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५ रा. तपोवन रोड, जि. अहिल्यानगर), प्रदीप संजय कापरे (वय २८ रा. तिंतरवणी ता. शिरुर कासार, जि. बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४० रा. शिवाजी नगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (वय ५३, रा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७ रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), अनिल सुधाकर पवार (वय ३४, रा. ५६ नंबर गेट मुकुंदनगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) फरार आहे.
बनावट नोटांच्या रॅकेटसंदर्भात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते आदी उपस्थित होते. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते २७ जुलै २०२५ रोजी अहिल्यानगर ते सोलापूर रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या अलिशान मोटारीत फिरत असून, त्यांच्याकडे पाचशेच्या बनावट नोटा आहेत.
त्यांनी आंबिलवाडी शिवारात पानटपरी वाल्याकडून पाचशे रुपये देऊन सिगारेटचे पाकिट खरेदी केले आहे. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबिलवाडी शिवारात जाऊन खात्री केली असता काळ्या रंगाच्या अलिशान मोटारीतून फिरणारे दोघे दिसले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन नावे विचारली असता त्यांनी निखील गांगर्डे, सोमनाथ शिंदे अशी नावे सांगितली. त्याच्या मोटारीची झडती घेतली असता मोटारीत ८० हजारांच्या पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळून आल्या. त्या नोटांबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींकडून अनेक खळबजनक गोष्टी पुढे येऊ लागल्या तर, अन्य साथीदारांची नावेही निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यातून प्रदीप कापरे, संभाजीनगरमधून मंगेश शिरसाठ, विनोद अरबट, आकाश बनसोडे, अनिल पवार यांना अटक केली. आरोपींनी छत्रपती संभाजीनगर तिसगाव, वाळूज परिसरात एक बंगला भाडेतत्त्वावर घेतला होता. त्या बंगल्यात बनावट नोटा छापण्याचा कारखाना टाकला होता. तिथे नोटा प्रिटिंग मशिन, कटिंग मशिन, हॅलोजन असे साहित्य मिळून आले. त्या बंगल्यात ५९ लाख ५० हजारांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी त्या नोटा, प्रिटिंग मशिन, कटिंग मशिन व अन्य साहित्य जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोलीस अंमलदार सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग, अदिनाथ शिरसाठ, अन्सार शेख, मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.
दारूच्या दुकानात बनावट नोटा..
बनावट नोटा चलनामध्ये आणण्यासाठी आरोपी विशेष फंड वापरत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी रस्त्यावरील पानटपरीवाले, चिकन, मच्छी विक्रेत, भाजी विक्रेते, दारूच्या दुकानात बनावट नोटांचा वापरत करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी किती नोटा बनविल्या, किती नोटा व्यवहारात आणल्या याचा शोध घेतला जात आहे. सात जणांना अटक केली असून, नोटा डिझाइन करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
राहुरी कनेक्शन असण्याची शक्यता..
गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी येथे व्यवहारात बनावट नोटा वापरासाठी आणलेल्या तिघांना पकडले होते. त्यांनीही टेंभूर्णी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे बनावट नोटांचा कारखाना आढळला होता. पोलिसांनी टेंभुर्णी येथे जाऊन बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्ह्यातही एक आरोपी कर्जत तालुक्यातील होता. त्यामुळे या गुन्ह्याचेही त्या आरोपीबरोबर कनेक्शन असू शकते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.