नेवासा- तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पितळी टाळ चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या २२४०० रुपये किमतीच्या २८ पितळी टाळांसह चोरीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
दिनांक २८ जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या टाळ चोरीला गेल्याचे समजल्यावर अशोक बाबासाहेब चौधरी (वय ६०, रा. रांजणगाव देवी, ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्या आधारे अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू करण्यात आला. डी.बी. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद ऑटोरिक्षा मंदिराच्या परिसरात फिरताना दिसून आली. याच आधारावर पोलिसांनी रिक्षाचा माग काढीत तपास शेवगावपर्यंत नेला. शेवगावमध्ये ही रिक्षा राजू भगवान नागरे (रा. दादेगाव रोड, शेवगाव) याची असल्याचे समजले. त्याचबरोबर संगीता सूर्यकांत सर्जेराव (रा. कापकर वस्ती, शेवगाव) हिचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी काहीच माहिती नाकारली. मात्र पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी अखेर चोरी कबूल केली. त्यांनी सिद्धेश्वर मंदिरातून पितळी टाळ चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोघांना अटक करून २८ टाळ आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली. भजनी मंडळाने टाळ परत मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
आरोपींनी याआधी इतर मंदिरांमध्येही चोरी केली आहे का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांनी सहभाग घेतला.