अकोले- तालुक्यात गेल्या काही वर्षात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अकोले व राजूर पोलीस ठाण्यात पोक्सोचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने या समित्या स्थापन केल्या आहेत.
अकोल्याचे तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने अकोले तालुका बाल संरक्षण समिती स्थापन केली असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत. एकात्मिक महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती कांता पंढरीनाथ गिरी या सचिव म्हणून काम करतील तर या समिती मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने पोलीस निरीक्षक मनोज बोरसे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी, बाळासाहेब दिनकर साळवे, अकोले

नगरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, तालुका शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, सामाजिक संस्था प्रतिनिधी पत्रकार श्रीनिवास रेणुकदास, बचत गट प्रतिनिधी छाया सुधीर मोहटे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार सर्वश, सचिन नाईकवाडी, कुमार प्रशांत शंकर सदगीर, प्रणिता दराडे, पूनम दादासाहेब बहिरट, जनवादी महिला संघटना प्रतिनिधी संगीता चंद्रकांत साळवे, चित्रा नामदेव डगळे, संगीता बाळासाहेब धुमाळ, वंदना मोहन गोसावी, मनीषा संजय भांगरे, अलका मंगेश गिरे, यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या समितीची पहिली बैठक सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार असून बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने बैठकीत विषय घेण्यात येणार आहेत. अकोले तालुक्यातील बालविवाह, बालकामगार व अन्य प्रश्नांवर या बैठकीत चर्चा घडवून आणू, असे या समितीचे सदस्य श्रीनिवास रेणुकदास यांनी म्हटले आहे.