Wheat Farming : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी मध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणात लागू होते. देशातील कृषी शास्त्रज्ञांनी आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या शेकडो जाती विकसित केल्या आहेत. गेल्यावर्षी गव्हाची अशीच एक जात प्रसारित करण्यात आली होती.
ऑगस्ट महिन्यात गव्हाची नवीन जात प्रसारित करण्यात आली. HI 1665 असे या नव्या जातीचे नाव. गव्हाची ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरकडून विकसित करण्यात आली आहे.

ही नव्याने विकसित करण्यात आलेली जात हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. खरे तर अलीकडे हवामान बदलामुळे गहू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. वाढत्या तापमानाचा गव्हाच्या पिकाला नेहमीच फटका बसतो.
दरम्यान आता हीच गोष्ट लक्षात घेता कृषी विद्यापीठाने HI 1665 ही गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. गव्हाचा हा नवा ववाण पश्चिम आणि दक्षिण भारतातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
गव्हाच्या या जातीचे पीक 110 दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 33 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. या जातीची विशेषता म्हणजे कमी पाण्यातही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक येथे याची लागवड करता येईल. या राज्यांमधील मैदानी भागात गव्हाच्या या नव्या जातीची लागवड करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र वाढू शकते असा अंदाज आहे.
कमी पाण्यात उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. गव्हाच्या या नवीन जातीपासून मर्यादित सिंचन परिस्थिती असल्यास हेक्टरी 33 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
मात्र या जातीची कमाल उत्पादनक्षमता 43 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आता शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली आणि याला चांगले पाणी मिळाले तर शेतकरी या पिकातून अधिकचे उत्पादन घेऊ शकणार आहेत.
या जातीचे पीक साधारणता नव्वद सेंटीमीटर पर्यंत वाढते. याच्या 1000 दाण्यांचे वजन सरासरी 44 ग्रॅम भरते. या जातीचा गहू तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. भुरा व काळा तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक आहे.