पुणे-अहिल्यानगर-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा रूट झाला फायनल ! रेल्वे मंत्र्यांनी स्वतः दिली मोठी अपडेट

Pune Nashik Railway News : पुणे, नगर अन नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी या प्रकल्पाचा मार्ग अखेर अहिल्यानगर–शिर्डीमार्गे निश्चित झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात पुढे जाणार असून त्याची मार्गरेषा अंतिम करण्यात आल्याने पुणे, नगर, शिर्डी आणि नाशिक परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूळ आराखड्यानुसार हा रेल्वेमार्ग थेट पुणे–नाशिक असा ठेवण्यात आला होता. परंतु जुन्नर तालुक्यातील खोडद येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) या मार्गामुळे प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विज्ञान संशोधनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे जुन्नरमार्गे जाणारा पर्याय रद्द करण्यात आला. परिणामी पुणे–अहिल्यानगर–शिर्डी–नाशिक हा नवीन, सुरक्षित आणि अधिक उपयुक्त मार्ग निवडण्यात आला, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. या नव्या मार्गाचा फायदा केवळ प्रवाशांनाच नव्हे तर राज्यातील धार्मिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि नाशिकचे त्र्यंबकेश्वर, ही दोन प्रमुख धार्मिक स्थळे या रेल्वेमार्गामुळे वेगवान, सोयीस्कर आणि थेट जोडली जाणार आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय हा मार्ग चाकण औद्योगिक वसाहती मधून जाणार असल्याने उद्योगक्षेत्रासाठी ही नवी संधी ठरणार आहे. मालवाहतूक खर्चात कपात होऊन ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला थेट लाभ मिळणार आहे. नवीन उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त होत असून या परिसरात रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा होईल.

नवीन रूट कसा ठरला?

रेल्वे मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवा रूट पुणे – चाकण – अहिल्यानगर – निंबळक – पुणतांबा – शिर्डी – नाशिक असा या मार्गाचा रूट निश्चित करण्यात आला आहे. यातील नाशिक–शिर्डी तसेच पुणे–अहिल्यानगर (१३३ कि.मी.) या दोन महत्त्वाच्या भागांचे DPR पूर्ण झाले अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच यातील काही ठिकाणी दुहेरीकरणाची कामे सुद्धा सुरु आहेत. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास पण व्यक्त केला जात आहे.