महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार ? मंत्रालयातून समोर आली मोठी अपडेट

DA Hike News : प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच मोदी सरकारने तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे.

आधी सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र या वाढीमुळे आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% इतका झाला असून ही वाढ जुलै 2025 पासून प्रभावी आहे.

महत्वाची बाब म्हणजे दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राचे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो मात्र यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतरही अजून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरू झाला असून राज्य सरकारी गट ड ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटना मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे.

यामध्ये त्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी केली आहे. महासंघाने दोन दिवसांपूर्वी अर्थात 16 डिसेंबर 2025 रोजी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाला सादर केले आहे.

खरंतर या आधी सुद्धा महासंघाकडून महागाई भत्ता वाढी संदर्भात पत्र सादर करण्यात आले होते. मात्र यावर अजूनही सरकारकडून कोणताच ठोस निर्णय झालेला नाही आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा महासंघाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना महागाई भत्ता वाढीबाबत पत्र सादर केले आहे.

महासंघाने ऑक्टोबर महिन्याच्या आठ तारखेला राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत पत्र पाठवले होते आणि त्यानंतर आता 16 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा पत्र पाठवले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व महागाईभत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना केंद्राप्रमाणे वर्षामध्ये दोन वेळा महागाईभत्ता वाढ दिली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 202ते पासून 3% महागाईभत्ता वाढ झाली असून, त्यानुसार त्यांची 55% वरुन 58% महागाई भत्ता वाढ झाली आहे.

परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यासाठी उपरोक्त संदर्भाधिन दि. 8 ऑक्टोबर, 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर महागाईभत्ता वाढ दिपावलीपूर्वी देण्याची विनंतीदेखील या महासंघाने शासनाला केलेली आहे.

तथापि, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी, राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे 1 जुलै, 2025 पासुनचा 3% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तात्काळ मंजूर करावा, अशी आपणास पुनच्छः विनंती आहे.