मोठी बातमी ! शक्तीपीठ महामार्ग आणि कल्याण – लातूर महामार्ग ‘या’ ठिकाणी एकमेकांना जोडले जाणार, महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये महत्त्वपूर्ण बदल

Maharashtra Expressway News : फडणवीस सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर ज्या महामार्गाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तो महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा हाती घेण्याचा एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने नागपूर आणि गोवा या दोन महानगरांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती दिली आहे.

शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर विकसित केला जातोय. मात्र शक्तिपीठाची लांबी समृद्धीपेक्षा जास्त असून शक्तिपीठ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे राज्यातील जवळपास 30 हून अधिक जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी देणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली असून याच्या अलाइनमेंट मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

प्रस्तावित नागपूर – गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या संरेखनात अलीकडेच महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुधारित संरेखनानुसार आता प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची लांबी वाढली आहे. सुरुवातीला जो मार्ग प्रस्तावित होता, त्यानुसार याची लांबी 801 किलोमीटर एवढी राहणार असा अंदाज होता.

मात्र नव्या अलाइनमेंटनुसार या महामार्गाची लांबी तब्बल 840 किलोमीटर इतकी झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला हा महामार्ग फक्त अकरा जिल्ह्यांमधून जाणार होता मात्र आता हा प्रकल्प 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे.

सातारा हा जिल्हा सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला जोडला जाणार आहे. नव्या अलाइनमेंटची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लातूर – कल्याण जनकल्याण महामार्ग आणि नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना कनेक्ट होणार आहेत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने शक्तिपीठचा जो नवीन आराखडा तयार केला आहे त्या नव्या आराखड्यानुसार लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील बार्शी रोडवर जनकल्याण आणि शक्तिपीठ महामार्गांची अंतरबदल (इंटरचेंज) मार्गिकेद्वारे जोडणी करण्यात येणार आहे.

यामुळे भविष्यात नागपूरवरून गोवा अतिजलद गाठता येणार असून, त्याच वेळी जनकल्याण महामार्गाच्या माध्यमातून मुंबईकडेही सहज प्रवास करता येणार आहे. या जोडणीचा मोठा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांना होणार आहे.

मुंबई – लातूर आणि पुढे हैदराबाद हा प्रवास वेगवान करण्यासाठी एमएसआरडीसीने कल्याण – लातूर – हैदराबाद द्रुतगती महामार्गाचे संरेखन तयार केले आहे. या महामार्गाला ‘जनकल्याण महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे.

कल्याण ते लातूर हा सुमारे ४४२ किमी लांबीचा टप्पा एमएसआरडीसीकडून विकसित केला जाणार असून, हा महामार्ग सेवेत आल्यानंतर लातूर ते कल्याण अंतर अवघ्या चार ते साडेचार तासांत पार करता येणार आहे. बदलापूरपासून सुरू होणारा हा महामार्ग लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे संपेल आणि पुढे हैदराबादपर्यंत वाढवण्यात येईल.

दरम्यान, नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाची लांबी सुरुवातीला 801 किमी प्रस्तावित होती. मात्र सुधारित संरेखनानंतर हा महामार्ग सुमारे 840 किमीचा होणार असून, सातारा जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता हा महामार्ग 13 जिल्ह्यांना जोडणार आहे.

शक्तिपीठ आणि जनकल्याण महामार्गाच्या जोडणीमुळे लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबई, गोवा तसेच जेएनपीए, वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळ गाठणे काही तासांत शक्य होणार आहे. परिणामी, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.