पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता मेट्रोतुन प्रवास करताना ‘हे’ पदार्थ घेऊन जाता येणार नाही

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर होत आहे. ही बातमी पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर पुणेकरांच्या माध्यमातून मेट्रो प्रवासाला आता चांगली पसंती मिळत आहे. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.

पण मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना काही नियमांचे सुद्धा पालन करणे अनिवार्य आहे. मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी महामेट्रोकडून काही नियम तयार करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रोने मेट्रो प्रवासादरम्यान काही वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. आता महा मेट्रो कडून पुन्हा एकदा निषिद्ध वस्तूंची माहिती जाहीर करण्यात आली आहे. खरेतर , मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही या नियमांची पुरेशी माहिती नसल्याने दररोज वादावादीचे प्रकार घडत आहेत.

यामुळे महा मेट्रो कडून पुन्हा एकदा अशा प्रतिबंधित वस्तूंची यादी देण्यात आली आहे. वास्तविक , नियमांची पूर्णपणे माहिती नसल्याने तपासणीदरम्यान मेट्रो स्थानकांवर अशा वस्तू आढळून येत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे अशा वस्तू आढळल्यास संबंधित प्रवाशांना थेट प्रवास नाकारला जात असून त्यामुळे अस्वस्थता निर्माण होत आहे. म्हणूनच प्रवाशांनी नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. मेट्रो प्रवास पूर्णतः वातानुकूलित असल्याने डब्यांमध्ये खिडक्या-दारे बंद असतात.

त्यामुळे कुजलेले, वास येणारे किंवा ज्वलनशील पदार्थ नेल्यास इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो तसेच सुरक्षिततेलाही धोका संभवतो. याच कारणास्तव मेट्रो कायद्यात अशा वस्तूंवर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.

या नियमांनुसार स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, आम्ले, विषारी रसायने, रेडिओऍक्टिव्ह पदार्थ, मोठ्या कात्र्या व चाकू, परवानाधारक बंदूक, ओल्या बॅटऱ्या, स्पिरिट, लायटर, काडेपेटी, तंबाखू, गुटखा, ई-सिगारेट, पेट्रोलियम पदार्थ, थिनर, वायू सिलिंडर, अश्रुधूर, तेलकट चिंध्या, मृतदेह, प्राणी-पक्षी, हाडे, मानवी देहाची राख, कुजलेली भाजीपाला सामग्री, कच्चे मांस तसेच सुकी मासळी यांना संपूर्ण बंदी आहे.

मांसाहारी पदार्थ केवळ सीलबंद अवस्थेत असल्यासच नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिजवलेले पदार्थ बंद डब्यात नेता येतील; मात्र प्रवासादरम्यान त्याचे सेवन करणे मनाई आहे. दरम्यान काही सवलतीही देण्यात आल्या आहेत.

सीलबंद दारूची बाटली नेता येईल, लहान सॅनिटायझर ठेवण्यास परवानगी आहे; परंतु वापर करण्यास मनाई आहे. कॅमेरा घेऊन जाता येईल; मात्र छायाचित्रणास बंदी आहे. नेलकटर, छोटी सुरी, ब्लेड यावर बंदी नाही. मात्र मेट्रो परिसरात च्युईंगम चघळण्यास तसेच धूम्रपानास कडक मनाई आहे.

महामेट्रोने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी नियमावली वाचावी, निषिद्ध वस्तूंसह मेट्रो परिसरात न जाणेच योग्य ठरेल. यामुळे अनावश्यक वाद, प्रवासात होणारा विलंब आणि सुरक्षेवरील धोके टाळता येऊ शकतील.