Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अति महत्त्वाचे आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ठाण्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरेल. कारण की ठाणे जिल्ह्यात लवकरच एका नव्या रेल्वे स्टेशनची निर्मिती होणार आहे.
हे नवा रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकादरम्यान विकसित होणार असून या निर्णयाचा ठाणे आणि मुलुंडदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव हा गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडला होता. पण रखडलेले नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन उभारणीचे काम अखेर मार्गी लागणार असे चित्र तयार झाले आहे.
या रेल्वेस्थानकाबाबत थेट दिल्ली दरबारातून मोठी माहिती समोर आली आहे. देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली असून त्यांना या स्थानकाच्या कामाबाबत आश्वस्त केले आहे.
खरेतर या रेल्वे स्थानकाच काम फक्त पैशांमुळे अडलं होतं मात्र आता पैशांचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून या निर्णयाचे शहरभर स्वागत होत आहे. या प्रकल्पाला स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पूर्वीच मंजुरी मिळाली होती आणि जवळपास 60 टक्के काम पूर्णही झाले होते.
मात्र सुरुवातीला 120 कोटी रुपयांचा असलेला प्रकल्पाचा खर्च कालांतराने वाढून तब्बल 245 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. मार्च 2025 मध्ये स्मार्ट सिटी मिशनची मुदत संपत असल्याने उर्वरित वाढीव निधी कोठून मिळणार, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परिणामी हे काम अनेक महिने थांबले होते.
परंतु अखेर केंद्र सरकारने पुढाकार घेत सर्व खर्च रेल्वे मंत्रालय उचलेल, असे स्पष्ट केल्याने प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे. या निर्णयामागे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के तसेच लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सातत्याने झालेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
त्यांनी संसदेत हा मुद्दा अधोरेखित करण्यासोबतच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करून कामे तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन स्टेशन सुरू झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवासी भार लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल, गर्दी कमी होईल आणि वेळेत मोठी बचत होईल. तसेच या परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळेल, असेही अपेक्षित आहे.
अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने ठाणे–मुलुंड परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता पुढील काही महिन्यांत कामाला वेग येऊन हे अत्याधुनिक स्टेशन लवकरात लवकर प्रवाशांसाठी उपलब्ध व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.