सोन्याच्या किमतीत अजूनही तेजीचे संकेत ! दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये मोजावे लागणार ? काय सांगतात तज्ञ

Gold Rate : सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आहे. खरे तर भारतात सोन्याला आणि चांदीला नेहमीच मागणी असते. सोन्याला आपल्या देशात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात सोन्याला फारच पवित्र मानले जाते आणि एखाद्या मंगल कार्यात सोने खरेदी शुभ समजले जाते.

विवाह सोहळ्यात देखील सोने खरेदीचे एक वेगळेच महत्त्व आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. यामुळे लग्नसराईच्या कालावधीत आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी देशात वाढते आणि या काळात किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढतात.

दरम्यान 2025 हे वर्ष सोन खरेदी करणाऱ्यांसाठी खास ठरल आहे. यावर्षी सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत. यामुळे आता अनेक जण सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा बाळगून आहेत. अशातच आता सोन्याच्या रेटबाबत एक नवा अंदाज समोर आला आहे.

खरे तर यावर्षी पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीने प्रति तोळा एक लाख रुपयांचा टप्पा पार केला. दरम्यान आता ही किंमत पुढे पण अशीच तेजीत राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काळात सोन्याची किंमत थेट दोन लाख रुपयांच्या आसपास पोहोचेल असा अंदाज समोर येत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की तज्ञांनी जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात सुरू असलेली तेजी 2025 प्रमाणेच 2026 मध्ये पण कायम राहणार असा विश्वास व्यक्त केला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी येत्या काळात सोन्याचा दर प्रति औंस 6000 डॉलर पर्यंत म्हणजेच 5.42 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज दिला आहे.

एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम. यानुसार सोन्याची किंमत येत्या काळात प्रतितोळा 1.90 लाख रुपयांपेक्षा अधिक होणार असा हा अंदाज आहे. जागतिक आर्थिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या सुरक्षित गुंतवणूक प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर तज्ञांकडून हा नवीन अंदाज देण्यात आला आहे.

डेव्हिड टेट यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होत असलेली वाढ ही अल्पकालीन चढ-उतार नाहीये. दीर्घकालीन आणि संरचनात्मक कारणांमुळे सोन्याचे रेट वाढत आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा प्रतिऔंस भाव 4 हजार 321 डॉलरपर्यंत पोहोचला होता, जो आतापर्यंतचा एक महत्त्वाचा उच्चांक मानला जात आहे.

महागाईचा दबाव, भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील सोनेखरेदी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून अधिक पसंती मिळत आहे. या भाववाढीला आशियाई देशांमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचाही हातभार लागत असल्याचे टेट यांनी नमूद केले.

चीनने अलीकडेच सोने खरेदीसंबंधीचे नियम शिथिल केले असून, त्यामुळे वैयक्तिक तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. याचबरोबर जपानमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्ती हस्तांतराची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या प्रक्रियेत सोन्याला महत्त्वाचे स्थान दिले जात आहे.

थोडक्यात 2025 प्रमाणे 2026 मध्ये देखील सोन्याच्या किमती अशाच वाढत राहतील असे चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळतंय. मात्र गुंतवणूकदारांचा हा अंदाज कितपत खरा ठरणार हे पाहणे सुद्धा तितकेच उत्सुकतेचे राहणार आहे.