राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी मिळणार मोठी भेट ! नोव्हेंबर , डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर

Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाकूळ सुरू आहे. 3 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे प्रक्रिया पूर्ण झाली. पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात.

तरीही काही जागांसाठी मतदानाची प्रक्रिया त्यावेळी पुढे ढकलण्यात आली होती आणि त्याच जागांसाठी आज 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम म्हणजेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

यानुसार, महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचाही बिगुल वाजण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या आधी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि मकर संक्रांतीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी योजनेतील लाभार्थी महिलांना सलग तीन हप्त्यांचा लाभ म्हणजेच एकूण 4 हजार 500 रुपये मिळणार अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

यापैकी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार अशी पण माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची आचारसहिता योजनेच्या निधी वितरणासाठी अडसर ठरत नाही असे स्पष्ट केले आहे.

यामुळे स्थानिकच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारकडून लागोपाठ हफ्त्याच वितरण होण्याची शक्यता आहे. यानुसार पुढील आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आणि डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्रितपणे मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे 14 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.

याबाबतचे नियोजन सरकारकडून सुरू असल्याचा दावा प्रसार माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते.

त्यात सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 11 लाखांपेक्षा अधिक महिलांचा समावेश होता. मात्र आचारसंहितेपूर्वी इतक्या मोठ्या संख्येतील अर्जांची पडताळणी करणे अशक्य असल्याने, सुरुवातीला कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरलेल्या लाभार्थींनाच लाभ देण्यात आला होता.

त्या वेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा सुमारे 166 कोटी रुपयांचा निधी लागणार होता. परंतु त्यानंतर झालेल्या सखोल पडताळणीत जिल्ह्यातील जवळपास दोन लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यामुळे जिल्ह्यावरील निधीचा भार सुमारे 30 कोटींनी कमी झाला आहे.

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, 21 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील महिला, सरकारी कर्मचारी, पुरुष लाभार्थी, चारचाकी वाहनधारक महिला तसेच इतर वैयक्तिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांचा हप्ता बंद करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये देण्यात येत आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थींना फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यान नियमित लाभ मिळणार असून, हा लाभ वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असली तरी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी एका महिन्याने वाढवली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना याचा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील लाखो महिलांच या निर्णयांकडे विशेष लक्ष राहणार आहे. अजूनही राज्यातील लाखो महिलांची केवायसी बाकी आहे आणि यामुळे जर शासनाकडून केवायसी प्रक्रियेला पुन्हा मुदत वाढ मिळाली तर याचा लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.