Maharashtra Expressway : अलीकडेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असल्याची माहिती सभागृहाला दिली.
राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर ते गोवा प्रवास अतिवेगवान करण्यासाठी अन आधी प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्ग प्रकल्पाला वाढता विरोध पाहता याच्या अलाइनमेंट मध्ये बदल केला आहे.

नागपूर–गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या संरेखनात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. दरम्यान या नव्या बदलामुळे आता राज्यातील दोन प्रस्तावित महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना कनेक्ट होणार आहेत.
तसेच नव्या बदलांमुळे शक्तिपीठ महामार्गाची लांबी सुद्धा वाढणार असे आणि आणखी एक जिल्हा या महामार्गाच्या नकाशावर येणार आहे.
सुधारित संरेखनानुसार आता हा महामार्ग कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्गाशी थेट जोडला जाणार असून, त्यामुळे राज्यातील पूर्व, मध्य आणि पश्चिम भागांमधील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.
एमएसआरडीसीने मुंबई–लातूर आणि पुढे हैदराबाद हा प्रवास जलद व्हावा यासाठी कल्याण–लातूर–हैदराबाद द्रुतगती महामार्गाचे संरेखन तयार केले आहे.
या महामार्गाला जनकल्याण महामार्ग असे नाव देण्यात आले असून, कल्याण ते लातूर या ४४२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम एमएसआरडीसीकडून करण्यात येणार आहे.
हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास लातूर ते कल्याण हे अंतर अवघ्या चार ते साडेचार तासांत पार करता येणार आहे. बदलापूरपासून सुरू होणारा हा महामार्ग लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे समाप्त होईल.
औराद शहाजनी येथून हा महामार्ग पुढे हैदराबादपर्यंत जाणार असून, मुंबई–हैदराबाद महामार्गाची एकूण लांबी ५९० किमी असेल. यामध्ये कर्नाटकातील ६१ किमी आणि तेलंगणातील ७९ किमी लांबीचा समावेश असून, त्या टप्प्यांची अंमलबजावणी संबंधित राज्यांकडून केली जाणार आहे.
दरम्यान, नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाची लांबी वाढून सुमारे ८४० किमी झाली असून, या महामार्गात आता १३ जिल्ह्यांचा समावेश होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील बार्शी रोडवर जनकल्याण आणि शक्तिपीठ महामार्गाची अंतरबदल (इंटरचेंज) मार्गिका उभारण्यात येणार आहे. यामुळे लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि धाराशीव जिल्ह्यांतील प्रवाशांना मुंबई व गोवा प्रवास काही तासांत करणे शक्य होणार आहे.
शक्तिपीठ आणि जनकल्याण महामार्गाची ही जोडणी भविष्यात विरार–अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशीही जोडली जाणार असल्याने जेएनपीए बंदर, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. या दोन्ही महामार्गांमुळे महाराष्ट्रातील दळणवळण, व्यापार आणि पर्यटनाला मोठा वेग मिळणार आहे.