अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा ! अडीच एकरात मिळवले १० लाखांचे उत्पन्न

Nagar News : शेती परवडत नाही, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी…. अशा वेगवेगळ्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. खरे तर शेतीचा व्यवसाय अलीकडे खरंच आव्हानात्मक झालेला आहे. नैसर्गिक आणि सुलतानी संकटांमुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नसल्याची बाब सातत्याने समोर येत आहे.

पण अशा या परिस्थितीत सुद्धा काही शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीचा व्यवसाय फायदेशीर बनवताना दिसतायेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातून असाच एक नवा प्रयोग समोर आला आहे. नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या अडीच एकर क्षेत्रातून दहा लाखांची कमाई मिळवली आहे.

यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याचे संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. बदलत हवामान, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

यामुळे कमी पाण्यात, कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न या संकल्पनेचा विचार सुरु झालाय. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची अलीकडे लागवड वाढली आहे. पारंपारिक पिकाने ऐवजी आता नगदी पिकांना प्राधान्य दिले जात आहे.

उस, गहू किंवा ज्वारीसारख्या पिकांऐवजी फळपिके, मसाल्याची पिके आणि भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अहिल्यानगर मधील एका शेतकऱ्याने आले लागवडीतून असाच एक नवा प्रयोग जगासमोर यशस्वी करून दाखवला आहे.

आले लागवडीतून शेतकरी बनला लखपती 

नेवासा तालुक्यातील सोनईगाव येथील शेतकरी संग्राम येळवंडे यांनी उसासाठी प्रसिद्ध असलेल्या जमिनीत आल्याची शेती करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. पारंपरिक उस शेतीला बाजूला ठेवत त्यांनी मसाल्याच्या पिकाकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सुरुवातीला हा प्रयोग जोखमीचा वाटत असला तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. मागील वर्षी संग्राम येळवंडे यांनी केवळ एका एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली होती.

या प्रयोगातून त्यांना तब्बल १०८ क्विंटल उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे शेतावरच त्यांना प्रति क्विंटल सुमारे ९ हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे अवघ्या एका एकरातून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आल्याच्या शेतीसाठी त्यांनी आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला. ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतांचा वापर, योग्य अंतरावर लागवड तसेच रोग नियंत्रणासाठी काळजीपूर्वक उपाययोजना करण्यात आल्या. यावर्षी त्यांनी एकरी ९ ते १० क्विंटल बियाण्याचा वापर केला.

लागवडीपूर्वी शेतात सुसज्ज बेड तयार करण्यात आले असून, बायोमी टेक्नॉलॉजीच्या कृषी प्रशिक्षणाचा त्यांना मोठा फायदा झाला. आल्याबरोबरच संग्राम येळवंडे हे कांदा, ऊस तसेच आंबा यासारखी फळबागही घेतात. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना त्यांचे भाऊ धनंजय येळवंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.

पेशाने इंजिनिअर असलेल्या भावाच्या तांत्रिक सल्ल्यामुळे शेतीत नवे प्रयोग यशस्वी होत असल्याचे संग्राम सांगतात. पारंपरिक शेतीला छेद देत मसाल्याच्या पिकातून यशस्वी आर्थिक मॉडेल उभे करणारे संग्राम येळवंडे आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्यासाठी त्यांचा हा प्रयोग दिशादर्शक ठरत असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांचे विशेष कौतुक होत आहे.