Nagar Expressway : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून एका नव्या महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनात शक्तिपीठ महामार्गाच्या रूट मध्ये बदल करतानाच कल्याण आणि लातूर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी नव्या जनकल्याण महामार्गाची सुद्धा घोषणा करण्यात आली.

दरम्यान, आता याच नियोजित महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची मागणी उपस्थित करण्यात आली आहे. शासनाने लातूर ते मुंबई हे अंतर कमी व्हावे आणि या दोन्ही महानगरांमधील प्रवासाचा कालावधी निम्म्यावर यावा यासाठी नवा जनकल्याण महामार्ग प्रस्तावित केला आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे बारा तासांचा प्रवास अवघ्या पाच तासांवर येणार असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या जनकल्याण महामार्ग प्रकल्पात बदल सुचवला आहे.
महामार्ग प्रकल्पात बदल व्हावा यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे एक महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. या पत्राचा विषय असा की नियोजित लातूर कल्याण महामार्ग म्हणजेच जनकल्याण महामार्गामध्ये आवश्यक बदल व्हावा.
खरे तर हा महामार्ग लातूर – अंबाजोगाई – केज – बीड – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण असा प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र आता प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावित रूट मध्ये थोडासा बदल सुचवला आहे.
मंत्री महोदयांनी प्रस्तावित महामार्गात तांत्रिक व व्यवहार्य दृष्टीने सुधारणा करण्याची संधी उपलब्ध असल्याचे नमूद करत हा प्रस्तावित मार्ग लातूर – कळंब – पारा – ईट – खर्डा – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण असा झाला पाहिजे अशी मागणी उपस्थित केली आहे.
दरम्यान त्यांनी या शहरांमधून हा महामार्ग प्रकल्प झाल्यास प्रवासाचे अंतर जवळपास 60 ते 70 किलोमीटर पर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे, शिवाय प्रकल्प खर्च सुद्धा कमी होऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जनतेलाही या प्रकल्पाचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे.
या प्रस्तावित महामार्ग प्रकल्पात धाराशिव जिल्हा समाविष्ट झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील शेती व शेतीशी निगडित व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांचे प्रॉडक्ट्स थेट मुंबई अन ठाणे महानगर प्रदेशाकडे नेता येतील आणि यामुळे या जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.
यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व बाबींचा सखोल विचार करून सदर प्रस्तावित महामार्गाच्या आराखड्यात योग्य तो बदल करावा अशी आग्रही मागणी पत्राद्वारे केली आहे. यामुळे आता प्रताप सरनाईक यांच्या या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.