मतदान कार्ड हरवलंय ? आता मोबाईलवर डाऊनलोड करता येणार मतदान कार्ड , पहा संपूर्ण प्रोसेस

Voter ID Card : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने नुकताच महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जानेवारीमध्ये यासाठी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यभरातील मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आता या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदारांकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक असून, अनेकांकडे वोटर आयडीची फिजिकल कॉपी उपलब्ध नसते.

मात्र आता मतदारांना काळजी करण्याची गरज नाही, कारण निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. म्हणजेच वोटर आयडी कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करून सहज वापरता येणार आहे. दरम्यान आज आपण मोबाईलमध्ये मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत. 

इ-एपिक कसे डाउनलोड करावे?

यासाठी प्रथम मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट https://voters.eci.gov.in/ वर जावे. जर आपण प्रथमच या पोर्टलचा वापर करत असाल, तर मोबाईल नंबरच्या मदतीने नोंदणी करावी लागेल.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘Download e-EPIC’ या पर्यायावर क्लिक करून आपला EPIC नंबर म्हणजेच वोटर आयडीवरील युनिक आयडी सबमिट करावा. त्यानंतर आपले डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करता येईल. हे कार्ड अधिकृत आणि कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे आणि मतदान केंद्रावर दाखवता येणार आहे.

मात्र डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करण्यासाठी आपला मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक असणे आवश्यक आहे. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर मतदारांनी अगोदर तो लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. दरम्यान तुम्हाला जर मोबाईल नंबर मतदान कार्डशी लिंक करण्याची प्रोसेस माहिती नसेल तर त्याबाबत पण आज आपण विस्तृत माहिती जाणून घेऊया. 

मोबाईल नंबर कसा लिंक कराल ?

मतदान कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन ‘Form 8’ हा पर्याय निवडावा लागेल.

त्यानंतर ‘Correction of Entries in the Existing Electoral Roll’ या पर्यायावर क्लिक करून आपला मोबाईल नंबर सबमिट करा. थोड्या वेळानंतर नंबर लिंक होईल. त्यानंतर पुन्हा EPIC नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशनद्वारे इ-एपिक डाउनलोड करता येईल.

या सुविधेमुळे मतदारांना मोठी सोय झाली आहे. आता मतदानासाठी ओळखपत्र हरवले, घरी विसरले किंवा फिजिकल कॉपी उपलब्ध नसली तरीही मोबाईलमधील डिजिटल वोटर आयडी दाखवून मतदान करता येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.