Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.
हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर मंजूर करण्यात आला असून यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या थांब्याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राज्याबाहेरील रेल्वेगाड्यांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये फारसे थांबे देण्यात आलेले नाहीत आणि यामुळे कोकणातील प्रवाशांचे मोठे हाल होतात. कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावतात पण याचा प्रत्यक्षात कोकणातील प्रवाशांना फायदा होत नाही.
त्यामुळे मुंबई, पुण्यातून कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जामनगर – तिरूनेलवेली एक्स्प्रेस आणि पोरबंदर – तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला कोकणातील संगमेश्वर रोड या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या दोन एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याने या निर्णयाचे कोकणातील प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. आता आपण रेल्वेच्या या निर्णयाची कधीपासून अंमलबजावणी होणार याची माहिती पाहूयात.
निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार?
जामनगर – तिरुनेलवेली द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस शुक्रवारपासून संगमेश्वर रोड या स्थानकावर थांबा घेणार आहे. तिरुनेलवेली – जामनगर द्वि साप्ताहिक एक्सप्रेस 29 डिसेंबर पासून संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा घेईल अशी माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
पोरबंदर – तिरुवनंतपुरम साप्ताहिक एक्स्प्रेस गुरुवारपासून संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणार आहे. तिरुवनंतपुरम – पोरबंदर साप्ताहिक एक्स्प्रेस 28 डिसेंबर पासून संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
नक्कीच रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा कोकणातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून या निर्णयाचा सर्वाधिक लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना होईल. मात्र संगमेश्वर रोड या स्थानकावर मंजूर झालेले थांबे प्रायोगिक तत्त्वावर आहेत.