नोकरी संपली तरी पैसा थांबणार नाही! पहा LIC ची जबरदस्त योजना…होईल फायदा

LIC Pension Scheme:- वृद्धापकाळ म्हणजे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारा टप्पा असतो. नोकरी किंवा व्यवसाय थांबल्यानंतर नियमित उत्पन्नाचे काय, रोजच्या खर्चाचे कसे होणार, औषधोपचार आणि घरखर्चासाठी पैसे पुरतील का, असे अनेक प्रश्न मनात येतात.

याच चिंतेतून मुक्त होण्यासाठी आजच योग्य नियोजन करणे फार गरजेचे आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य शांत, सुरक्षित आणि आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर खात्रीशीर पेन्शन योजना हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. याच पार्श्वभूमीवर भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीची ‘न्यू जीवन शांती’ ही योजना सध्या अनेक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि त्याच्या बदल्यात आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळते.

एलआयसी ‘न्यू जीवन शांती’ योजनेची वैशिष्ट्ये काय?

एलआयसी ‘न्यू जीवन शांती’ ही एक सोपी आणि समजायला सहज अशी पेन्शन योजना आहे. ही योजना ‘सिंगल प्रीमियम डिफर्ड अॅन्युइटी’ प्रकारातील आहे. याचा अर्थ असा की पॉलिसी घेताना तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवता आणि ठराविक कालावधीनंतर तुम्हाला पेन्शन मिळायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पॉलिसी घेतानाच तुम्हाला भविष्यात किती पेन्शन मिळणार आहे, हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा किंवा व्याजदर बदलण्याचा तुमच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम १.५ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, ज्यांच्याकडे जास्त रक्कम आहे, ते अधिक गुंतवणूक करून जास्त पेन्शन मिळवू शकतात. ही योजना ३० ते ७९ वर्षे वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध आहे. त्यामुळे तरुण वयातही ही योजना घेऊन निवृत्तीची तयारी करता येते, तसेच निवृत्तीच्या जवळ असलेले लोकही या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

या योजनेत कशी करता येते गुंतवणूक?

या योजनेत गुंतवणुकीसाठी दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे सिंगल लाईफ पर्याय. या पर्यायात एका व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याने गुंतवलेली मूळ रक्कम त्याच्या वारसाला परत दिली जाते. दुसरा पर्याय म्हणजे जॉइंट लाईफ. या पर्यायात पती-पत्नी दोघांचा समावेश करता येतो. यामध्ये दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतरही दुसऱ्याला पेन्शन सुरूच राहते आणि दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गुंतवलेली रक्कम वारसाला मिळते.

त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा पर्याय खूप उपयोगी ठरतो.‘न्यू जीवन शांती’ योजनेत ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. म्हणजेच एकदा रक्कम गुंतवल्यानंतर ती किमान पाच वर्षांसाठी ब्लॉक होते. या पाच वर्षांनंतर निवडलेल्या पर्यायानुसार पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. मात्र, गरज भासल्यास ही पॉलिसी मध्येच सरेंडर करण्याची सुविधाही दिली आहे. याशिवाय या पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने आकस्मिक गरजांमध्ये मदत होते.

ही योजना कशी ठरते फायदेशीर?

ही योजना कशी फायदेशीर ठरू शकते, हे एका उदाहरणातून समजून घेता येईल. समजा ५५ वर्षांच्या एखाद्या व्यक्तीने या योजनेत ११ लाख रुपये एकरकमी गुंतवले आणि ५ वर्षांचा डिफर्ड कालावधी निवडला. अशा परिस्थितीत ६० व्या वर्षानंतर त्यांना दरवर्षी सुमारे १.०२ लाख रुपये पेन्शन मिळू शकते. जर त्यांनी मासिक पेन्शनचा पर्याय निवडला, तर सुमारे ८ हजार रुपयांहून अधिक रक्कम दरमहा मिळू शकते. ही रक्कम आयुष्यभर निश्चित स्वरूपात मिळत राहते. अर्थात वय आणि गुंतवणुकीच्या रकमेप्रमाणे पेन्शनमध्ये थोडाफार फरक पडू शकतो.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे पेन्शन घेण्याची लवचिकता. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा कोणत्याही स्वरूपात पेन्शन घेऊ शकता. तसेच एलआयसी ही सरकारी कंपनी असल्याने गुंतवलेल्या भांडवलाची पूर्ण सुरक्षितता मिळते. बाजारातील जोखमींपासून दूर राहू इच्छिणाऱ्या की ज्यांना खात्रीशीर उत्पन्न हवे आहे, अशा लोकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. एकूणच वृद्धापकाळातील आर्थिक चिंता दूर करून शांत आयुष्य जगायचे असेल, तर एलआयसीची ‘न्यू जीवन शांती’ योजना एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय ठरू शकते.