Pune News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी मनमाड ते पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. एक तर रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे कानाकोपऱ्यात पसरलेले आहे यामुळे भारतात कुठेही प्रवास करायचा असला तरीसुद्धा रेल्वे उपलब्ध होते. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.
दरम्यान याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे ते मनमाड या रेल्वे मार्गावर उच्च दर्जाचे नवीन रुळ टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुणे – मनमाड हा देशातील एक महत्त्वाचा आणि अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या डे बाय डे वाढत आहे. यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी नवे रूळ टाकले जात आहेत. या नव्या रुळांची विशेषता अशी की यांची वजन सहन करण्याची क्षमता फार अधिक आहे.

हे रूळ जवळपास 550 जीएमटी म्हणजेच 55 कोटी टन एवढे वजन पेलू शकणार आहेत. यामुळे या व्यस्त मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. सध्या स्थितीला पुणे विभागातील पुणतांबा ते कन्हेगाव या रेल्वे स्टेशन दरम्यान हे काम सुरू आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना रेल्वे प्रशासनाने फारच बारीक नियोजन केले होते. रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद न करता ठराविक कालावधीसाठी ब्लॉक घेऊन या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे नेले जात आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अबाधितपणे सुरू आहे. ह्या कामासाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. ‘पीक्यूआरएस’ म्हणजेच प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पाचे काम केले जात आहे. एका महिन्याच्या कालावधीत प्रशासनाने या मार्गावरील नऊ किलोमीटर लांबीचे रूळ चेंज केले आहे.
रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार
पुणे – मनमाड रेल्वे मार्गासाठी आधी 52 किलो वजनाचे रूळ वापरण्यात आले होते. पण आता जुन्या रुळांच्या जागी नवीन रूळ बसवण्याचे काम सुरु आहे, जे की 60 किलो वजनाचे आहेत. हे नवे रुळ आधीपेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ आहेत.
दरम्यान या प्रकल्पामुळे या रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे. सध्या स्थितीला या मार्गावर 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाड्या धावत आहेत मात्र प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा सरासरी वेग 130 km पर्यंत पोहोचणार अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
साहजिकच यामुळे पुणे ते मनमाड हा रेल्वे प्रवास वेगवान होणार असून येत्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पाची आणखी एक विशेषता म्हणजे अल्ट्रासोनिक टेस्टिंग सारख्या आधुनिक तपासणीमुळे रुळाला पडणारे छोटे तळे वेळेत ओळखता येतील आणि यामुळे मोठे अपघात टाळता येणे शक्य होणार आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड मालगाड्या सुद्धा धावतात आणि यामुळे रुळांवर ताण येतो. पण नवीन रुळ मजबूत आहेत, त्यामुळे रुळांवरील ताण कमी होईल. तसेच जाणकार लोकांनी एकदा या मार्गावरील सर्व रूळ चेंज झालेत की पुढील दीड – दोन दशक म्हणजेच 15 ते 20 वर्ष रूळ बदलण्याची गरज राहणार नाही अशी माहिती यावेळी दिली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीनही जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.