Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. खरंतर, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे.
दुसरीकडे राज्यातील ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तसेच इतरही अनेक राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 एवढे करण्यात आले आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसोबत असा दुजाभाव का होतोय हा मोठा यक्षप्रश्न उपस्थित होत असून अशातच आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय थेट 65 होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार
जसं की आपणास ठाऊकच आहे की मागील दीड-दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे मात्र वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असतानाही वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती होत नाहीये. यामुळे वैद्यकीय आणि शिक्षण विभाग वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 64 वर्ष इतके आहे मात्र यामध्ये आणखी एका वर्षाची वाढ होण्याची शक्यता असून या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय आणि शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आला असल्याचा दावा केला जातोय. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे पण त्या तुलनेत प्राध्यापकांची भरती झाली नाही आणि यामुळे राज्यातील बहुतांशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत.
आता याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 64 वरून 65 होणार असा अंदाज आहे. दरम्यान सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या जर खऱ्या ठरल्यात तर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत अधिष्ठाता, संचालक आणि प्राध्यापकांना एका वर्षाची अतिरिक्त सेवा देता येणार आहे आणि या निर्णयाचा त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा आकडा वाढतोय आणि यामुळे संबंधित प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत आग्रही मागणी उपस्थित होऊ लागली आहे.
खरे तर मध्यंतरी महाविद्यालयातील अध्यापक संघटनांकडून पदभरती साठी केल्या जाणाऱ्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर अध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि अधिष्ठाता अशा काही पदांची भरती झाली मात्र तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दरम्यान वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सध्या काम सुरू असल्याची माहिती दिली असून असा निर्णय घ्यायचा असल्यास त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवणे मात्र आवश्यक राहणार आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात राज्य मंत्रिमंडळासमोर जर हा प्रस्ताव मांडला गेला तर मंत्रिमंडळ या प्रस्तावाला मान्यता देणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.