Maharashtra Havaman Andaj : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण विश्व सज्ज झाले आहे. सगळीकडे नववर्षाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे आणि बाजारपेठा देखील सजल्या आहेत. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागताला पावसाची पण हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे.
हवामान खात्याने पाच राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे आणि यामुळे काही ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची मजा थोडी कमी होऊ शकते असे चित्र तयार होऊ लागले आहे. खरे तर अनेकजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. यामुळे सध्या बसेस मध्ये तसेच ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

पण नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला देशातील उत्तरेकडील काही राज्यांमध्ये आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची 31 डिसेंबरच्या आनंदावर काही प्रमाणात विरजण पडण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक आहे. आपल्या राज्यात देखील उत्तर महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे. प्रामुख्याने धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक व अहिल्या नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा फारच खाली आला आहे. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच आता हवामान खात्याने दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर आणि हरियाणा येथे पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान या राज्यांमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून पावसाला सुरुवात होणार असून या पावसानंतर संबंधित राज्यातील तापमान आणखी तीन ते चार अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पावसानंतर या राज्यांमधील थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते. एवढेच नाही तर देशातील काही प्रमुख शहरांमध्ये दात धुक्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवस दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज दिला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नववर्षाच्या स्वागतासाठी हजेरी लावणार असे आयएमडीने स्पष्ट केले असून या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या नागरिकांना किनारपट्टीपासून लांब राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
मासेमारी करणाऱ्यांनी पुढील काही दिवस समुद्रात जाऊ नये असे आयएमडी कडून सांगितले गेले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली बाबत बोलायचं झालं तर उद्यापासून म्हणजेच 30 डिसेंबर पासून येथे ढगाळ हवामान तयार होणार असून 31 डिसेंबरला येथे सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. दरम्यान आयएमडीने सांगितलेल्या राज्यांमध्ये पावसानंतर थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. साहजिकच या पावसाचा संबंधित राज्यांमधील शेती पिकांवर देखील परिणाम होणार आहे.
महाराष्ट्राच हवामान कस राहणार?
आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात सध्या तरी कुठेच पाऊस पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी याबाबत चिंता करू नये असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे. शेतकऱ्यांनी आपली नियोजित कामे सुरू ठेवावी पुढील काही दिवस राज्यातील हवामान असेच कायम राहणार असून थंडीची तीव्रता पुढील काही दिवस अशीच राहील असा अंदाज समोर आला आहे.