मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग

Mumbai Nashik Railway : राजधानी मुंबई आणि नाशिक शहरातील नागरिकांसाठी महत्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर मुंबई नाशिक प्रवास आता वेगवान होणार आहे.

नाशिककरांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे लोकल अर्थात उपनगरीय रेल्वे सेवेचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आले आहे. खरेतर लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते.

लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. आता हिच मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे थेट उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत धावणार असल्याचे आहे. कारण की एका महत्त्वाच्या प्रकल्पाला नुकतीच केंद्राकडून मान्यता मिळाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने कसारा ते मनमाड दरम्यानच्या १३१ किलोमीटर लांबीच्या नव्या समांतर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. आता या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत एक मोठी क्रांती येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकलसोबतच आतां मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान

सध्या कसारा घाटातील तीव्र चढण आणि अवघड वळणांमुळे रेल्वे गाड्यांना अतिरिक्त इंजिन म्हणजेच ‘बँकर’ लावावे लागतात. या प्रक्रियेमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो, तसेच मालवाहतुकीवरही मर्यादा येतात. मात्र, नव्या कसारा–मनमाड प्रकल्पामुळे ही अडचण कायमची दूर होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत घाट परिसरात दोन नवीन समांतर रेल्वे मार्ग टाकले जाणार असून, त्यामध्ये तब्बल १८ आधुनिक बोगद्यांचा समावेश असेल. या बोगद्यांमुळे चढाईची उंची लक्षणीयरीत्या कमी होणार असून, त्यामुळे गाड्यांना अतिरिक्त इंजिनची गरज भासणार नाही. परिणामी, घाट ओलांडताना होणारी विलंबाची समस्या दूर होऊन प्रवासाचा वेळ किमान ३० ते ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.

मध्य रेल्वेवरील मुंबई ते भुसावळ हा मार्ग देशातील सर्वाधिक गजबजलेल्या रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे ४,५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

कल्याण–कसारा आणि मनमाड–भुसावळ दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम आधीच सुरू असून, आता कसारा–मनमाड हा महत्त्वाचा दुवा पूर्ण झाल्यास संपूर्ण मार्गिका अधिक सक्षम बनेल.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने जमिनीच्या संपादनासंदर्भात अधिकृत राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर, वंजारवाडी, देवळाली, संसरी, विहितगाव, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव आणि सिद्ध पिंप्री या गावांमधून हा मार्ग जाणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई–नाशिक थेट लोकल सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार आहे. तसेच मेल व एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढेल, घाटात होणारी प्रतीक्षा संपेल आणि मालवाहतूक सुलभ झाल्याने नाशिक व परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. एकूणच, हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे.