Bullet Train : देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अर्थातच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. खरेतर, काम थांबवण्याच्या नोटिशीमुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला असतानाच आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या थेट उदघाट्नाची तारीख समोर आली आहे.
लोकार्पणाच्या घोषणामुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प चर्चेत आला आहे. खरेतर राज्यात या प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे. प्रदूषणविषयक नियमांचे पालन न झाल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाने बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.

त्यामुळे प्रकल्पाच्या काही कामांना तात्पुरता फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर केला असून, १५ ऑगस्ट २०२७ रोजी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पार करता येणार असून, दर ३० मिनिटांनी ट्रेन उपलब्ध होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अत्याधुनिक जपानी शिंकान्सेन हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत बीकेसी ते शिळफाटा दरम्यान सुमारे २१ किलोमीटर लांबीचा भुयारी बोगदा उभारण्यात येत आहे. यापैकी ५ किलोमीटरचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) तंत्राने शिळफाटा ते घणसोली दरम्यान बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किलोमीटरचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (TBM) च्या सहाय्याने तयार केला जात आहे.
विशेष म्हणजे, या बोगद्यात ठाणे खाडीखालील सुमारे ७ किलोमीटर लांबीचा भागही समाविष्ट आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा दरम्यान सुरू केला जाणार आहे.
त्यानंतर वापी ते सुरत आणि पुढे वापी ते अहमदाबाद असे टप्प्याटप्प्याने मार्ग सुरू होतील. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते अहमदाबाद आणि अखेरीस मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन धावेल.
किती स्थानके विकसित होणार
या मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे संपूर्ण मार्गावरील एकमेव भूमिगत स्टेशन असणार आहे. सुमारे ३२.५ मीटर खोलीवर उभारल्या जाणाऱ्या या स्टेशनमध्ये तीन मजले, सहा प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक प्रवासी सुविधा असतील.
मेट्रो आणि रस्ते वाहतुकीशी थेट जोडणी असल्याने प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद दरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.