अहिल्यानगर जिल्ह्यात २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीला प्रवेश, विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल तर कला अन् वाणिज्य शाखेकडे फिरवली पाठ

Published on -

अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीला १ जुलैपासून सुरुवात झाली असून ७ जुलैपर्यंत विविध कनिष्ठ महाविद्यालयात २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी विविध शाखांत प्रवेश घेतले. यामध्ये कला, वाणिज्य शाखेपेक्षा तीनपट १५ हजार ६६० विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पहिली पसंती दिली.

त्याखालोखाल ५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी कला शाखेत, तर ३२२३ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले आहेत. एकूण प्रवेशाच्या दुप्पटीपेक्षा व अन्य शाखांच्या तुलनेत तीनपट विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला प्राधान्य दिले, वाणिज्य व कला शाखेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हावा, अशी आजही प्रत्येक पालकाची इच्छा असते.

त्यानुसार प्रत्येक पालक आपल्या मुलाला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरीत आहे. जिल्ह्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशावरून हे दिसून येत आहे. जिल्ह्यात १ जुलैपासून अकरावीच्या कॅप व कोटा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. ७जुलैपर्यंत अकरावीची प्रवेशाची
पहिली फेरी पूर्ण झाली. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात ४५४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी असून यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ५२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. जिल्ह्यात विविध तुकड्यांची प्रवेश क्षमता ८० हजार आहे. नियमित फेरी एकमधील कॅप व कोटा अंतर्गत प्रवेश पूर्ण झाली. १ ते ७ जुलै दरम्यान २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. त्यानंतर ९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार असून दहा जुलैपासून दुसऱ्या फेरीस सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शाखांच्या १०५७ तुकड्या मंजूर आहेत. यामध्ये कला शाखेच्या ३७४ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६१, विज्ञान शाखेच्या ४८४, संयुक्त २९, व्होकेशनल शाखेच्या ९ शाखांचा समावेश आहे. या शाखांत सुमारे ८० हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.

कला, वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाची पसंती विज्ञान शाखेकडे आहे. कला शाखेत फारशा संधी उपलब्ध नाहीत. यापूर्वी कला शाखेत उपलब्ध असलेल्या संधीवर शासनाने बंदी घातली. यापूर्वी कला शाखेतून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत होते. परंतु आता स्पर्धा परीक्षा नियमित होत नाहीत. निवड झाल्यानंतरही नियुक्त्या होत नाहीत. कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही संधी मिळत नाहीत. मराठी माध्यमाच्या कला शाखेच्या बाबतीत समाजासह सरकार उदासिन आहे.
– प्रा. डॉ. सुधाकर शेलार, सदस्य, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

प्रत्येकाची डॉक्टर, इंजिनियर होण्याची इच्छा

पारंपरिक पद्धतीमुळे आजही कला, वाणिज्य शाखांपेक्षा विज्ञान शाखेकडे पालकांसह विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. माझा मुलगा, डॉक्टर, इंजिनियिर व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा आहे. त्यामुळे विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. परंतु विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला, तरी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के परिश्रम करावे.
– संध्या गायकवाड
जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अहिल्यानगर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!