अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यामध्ये क्राईमच्या संदर्भात दुसरा क्रमांक लागतो. गुन्हेगार दिवसेंदिवस गुन्हा करण्याच्या पध्दती बदलत आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते. गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी जिल्हा पोलीस दल विविध संकल्पना राबवीत आहे. येणाऱ्या काळात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध धडक मोहीम आखली आहे. विशेष पथक तयार करून अवैध व्यावसायिकांची पाळीमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले की, दिवसेंदिवस गुन्हेगारी क्षेत्र वाढ होत आहे. गुन्हेगार आता गुन्ह्याच्या पद्धती सुद्धा बदलत आहेत.

त्यामुळे पोलिसांना सुद्धा अधिक स्मार्ट पोलिसिंग करण्याची गरज भासत आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सेंट्रलाईज सीसीटीव्ही सिस्टम बसविण्यात आले आहे. कारण, गुन्हा घडल्यानंतर तत्काळ त्या सीसीटीव्हीमध्ये पाहून आरोपीचा शोध घेण्यास मदत होते. मात्र, आता सीसीटीव्हीला सुद्धा मर्यादा येऊ लागल्या आहेत. गुन्हेगार कोणत्या दिशेला गेला एवढीच काय माहिती सीसीटीव्हीमध्ये मिळते.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सीसीटीव्हीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी नव्याने काही करता येईल का? याचा प्रयत्न असणार आहे. गुन्हेगार एकदा सेंट्रलाईज सीसीटीव्हीमध्ये आल्यानंतर तो
ज्या ज्या स्पॉटला जाईल तो तो स्पॉट सीसीटीव्हीमध्ये रेड होईल किंवा सायरन वाजेल, अशी काही बदल करता येतील का त्यासाठी या तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.
शाळेसमोरील टपऱ्या हटवणार
जिल्ह्यातील मावा व सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. शाळा महाविद्यालयाच्या आवारात शंभर मीटरवर मावा, गुटखा, पानटपरी असू नये, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालयांच्या आवारामध्ये असणाऱ्या अवैध टपऱ्या हटविण्यासाठी पोलिसांचा पुढाकार असणार आहे. याच टप्प्यावर मावा तंबाखू मिळते आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना थांबण्याचा हा एक ठेपा असतो. त्यामुळे अशा टपऱ्या शाळा महाविद्यालयाच्या परिसरात राहणार नाही, यासाठी पोलीस धडक मोहीम आखणार आहे.
खबऱ्यांचे नेटवर्क वाढविणार भर
साधारण दहा वर्षांच्या काळात पूर्वी जिल्हा पोलीस दलात तंत्रज्ञानाचा अभाव होता. तरीसुद्धा अतिक्लिष्ट गुन्ह्यांची उकल होत होती. आता आधुनिक तंत्रज्ञान आल्याने गुन्ह्याची उकल करणे आणखी सोपे झाले आहे. मात्र असे काही गुन्हे असतात की त्या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना अवघड जाते. त्यासाठी पोलिसांना पूर्वीसारखे खाबऱ्यांचे नेटवर्क पक्क करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील १० अंमलदार असे असावे त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्क पक्का असणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देण्याचाही मानस आहे.
पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यावर भर असेल
जिल्ह्यात सध्या ३२ पोलीस ठाणे आहेत जिल्ह्यातील क्राईम रेट लक्षात घेता आणखी आठ पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे, म्हणजेच जिल्ह्याला जवळपास ४० पोलीस ठाण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पोलीस ठाणे वाढवायचे म्हटले की, मनुष्यबळ वाढवावी लागते. मनुष्यबळ वाढविण्यासाठी ही प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. परंतु, त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.