अहिल्यानगर- जिल्ह्यात मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर अधिक असून हे लिंग गुणोत्तर संतुलित करण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विशेष मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश देत, विशेषतः ज्या गावांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे तिथे व्यापक जनजागृती व कृती आराखडा राबविण्यावर भर दिला.
डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अॅड. सारीका सुरासे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले की, ग्रामपातळीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय समित्या स्थापन कराव्यात. या समित्यांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असावा.

अनधिकृतपणे गर्भधारणेपूर्व किंवा प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे व कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही देण्यात आले. यामुळे अशा बेकायदेशीर व्यवहारांवर आळा बसेल आणि मुलींच्या जन्माबाबत समाजात विश्वास निर्माण होईल.
खाजगी रुग्णालयांतही जन्म आणि मृत्यूची नोंद वेळेवर व्हावी, यासाठी आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात यावी. हे सेवक नियमितपणे भेटी देऊन नोंदींचे संकलन करतील, असे आदेशही बैठकीत देण्यात आले. ही प्रक्रिया लिंग गुणोत्तराचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
जिल्ह्याच्या काही दुर्गम भागांमध्ये पावसामुळे संपर्क तुटतो. या गावांतील गरोदर महिला व रुग्णांसाठी सुरक्षित आणि वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. एकही महिला किंवा रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहता कामा नये, यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश होते.
डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा साथीचे आजार रोखण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र व मोठ्या गावांमध्ये आरोग्य पथकांनी गृहभेटी घ्याव्यात. कीटकनाशक फवारणी, साचलेले पाणी काढणे, स्वच्छता मोहीम राबवणे यावर भर द्यावा. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.
संशयित क्षयरुग्णांचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे झोपडपट्ट्या, ऊसतोड कामगारांची वसाहत, औद्योगिक परिसर याठिकाणी तपासणी वाढवावी. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार सुरू करावेत आणि त्यांची नोंद ‘निक्षय’ पोर्टलवर करणे अनिवार्य असल्याचे आदेश देण्यात आले.