अहिल्यानगरमधील लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, लिंबाला मिळाला तीन वर्षांतील सर्वात निचांकी दर

Updated on -

अहिल्यानगर- गेल्या तीन वर्षातील निचांकी भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांसाठी लिंबू अधिकच अंबट ठरू लागले आहे. सध्या अगदी प्रतिकिलोला बारा ते तेरा रूपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

एरवी पावसाळा, हिवाळा या दोन्ही ऋतूमध्ये लिंबाचे भाव कमी होतात. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात या दोन्ही ऋतूत अगदी उन्हाळ्याप्रमाणे चांगले भाव राहिले. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या प्रारंभी तीस ते चाळीस रूपये प्रतिकिलो लिंबाला भाव होता. मात्र, यंदा तशी स्थिती नाही.

श्रीगोंदा तालुक्यासह जामखेड तालुक्यातील नान्नज, जवळा, हळगाव पट्ट्यातील गावांमध्ये लिंबू उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागातील शेतकरी लिंबू उत्पादनातून दरवर्षी मोठी उलाढाल करतात. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षात लिंबाला भावही चांगला मिळतो. मात्र, चांगले उत्पादन मिळणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा होत आहे. गेल्या काही वर्षात लिंबाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी लिंबाचे उत्पादन कमी झाल्याने बागा काढून टाकल्या आहेत.

उत्पादनच कमी असल्यामुळे साहजिकच गेल्या काही वर्षात लिंबाला चांगला भाव मिळत आहे. मात्र, आता पाऊस सुरू झाल्यापासून लिंबू भाव कमी कमी होत गेले. यंदा तर अगदी मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पाऊस सुरू झाला. मे महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याने लिंबाला उचांकी भाव मिळतो. यंदा तोच महिना पाऊस राहिला. त्यामुळे महिन्यापासूनच लिंबू भाव घसरायला सुरवात झाली. यंदा शंभर रूपये प्रतिकिलोपर्यंत मार्च महिन्यातच लिंबू भाव गेले होते.

नंतर काहीसे भाव कमी झाले. सरासरी ७० ते ८० रूपये प्रतिकिलो भाव उन्हाळ्यात राहिले होते. आता अगदीच बारा ते तेरा रूपये किलोने लिंबाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, पाणी, फवारणीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

लिंबू प्रक्रिया उद्योगाची केवळ चर्चाच…

श्रीगोंदा, जामखेड तालुक्यात लिंबू उत्पादन चांगले होते. त्यामुळे विशेषतः श्रीगोंदा तालुक्यात लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करतात. मात्र, याबाबत राजकीय नेत्यांकडून चर्चाही केली जाते. मात्र ही चर्चा केवळ निवडणुकांपुरतीच राहते. त्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेल्याचे दिसून येत नाही. केवळ लिंबाचे भाव कमी झाले की याची चर्चा होते आणि नंतर भाव वाढले की शेतकऱ्यांसह सर्वचजण विसरून जातात.

मोठ्या शहरातील पावसामुळे दरात घट…

जयपूर, दिल्ली, मुंबई आदी मोठ्या शहरांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथे लिंबाची मागणी कमालीची घटली आहे. तसेच हैदराबाद परिसरातील लिंबूही विक्रीस उपलब्ध आहे. मागणीच अत्यंत कमी असल्याने लिंबाचे भाव कमी झाले आहेत, अशी माहिती लिंबू खरेदीदार अक्षय शेंडगे यांनी सांगितले.

लिंबाच्या आगाराला घरघर…

लिंबू आगार अशी श्रीगोंदा तालुक्याची ओळख आहे. कसलीही फवारणी नाही. केवळ खत-पाणी व्यवस्थित करायचे अन चांगले उत्पादन, चांगले पैसे, असे गणित लिंबाचे होते. तसेच येथे खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणावर व्यापारी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढू लागल्या. एकाएकी लिंबावर रोगराई दिसू लागली फूलगळ, फळगळ व्हायला लागली. उत्पादनाच कमालीची घट होऊ लागली. अगदी कधीही फवारणी न केलेल्या लिंबू बागांवर औषध फवारणी करावी लागली. त्यातूनही अनेकांच्या बागा सावरल्याच नाहीत. अखेर मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबू बागा काढून टाकल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे लिंबू आगाराला घरघरच लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!