अहिल्यानगर जिल्ह्यात ३० हजारांहून अधिक बसवण्यात आले सौर पंप! सौर पंप दुरुस्तीसाठी आता ऑनलाइन तक्रार व्यवस्था, जाणून घ्या प्रक्रिया

Published on -

अहिल्यानगर- जिल्ह्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या ३० हजार ६९७ वर पोहोचली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’, प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप’ अशा दोन योजनांद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येत आहेत.

सौर कृषी पंप बसवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे होय. यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल वाचते, डिझेलवरील खर्च कमी होतो आणि पर्यावरण संवर्धनही होते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’, प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप’ अशा दोन योजनांद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जात आहेत.

शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसविल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाईन तक्रार करता येईल. मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स कोसळून नुकसान झाले.

अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नाही, सौर पॅनल्सची किंवा पंपाची चोरी होणे, अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे, अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे.

शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल.

शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख असेल.

सौरपंपाबाबत अशी करा तक्रार…

लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवर फोन करून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तरी पुरेसे आहे. शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात. आपला जिल्हा, तालुका, गाव व स्वतःचे नाव, अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!