अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती

Published on -

एकरी लाखो रुपयांचा खर्च करून शेतीत घाम गाळत मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळालाच नाही तर शेतकरी आर्थिक ओझ्याखाली दबला जातो. आर्थिक खर्च मातीमोल झाल्याने शेतकऱ्याला पुन्हा उभारी घ्यायला बराच कालावधी लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी कांद्याला कोणत्या बाजारपेठेत योग्य बाजार भाव मिळेल याचा शोध घेऊनच कांदा विक्रीसाठी पाठविण्याचे धाडस करत आहेत.

जवळच्या बाजारपेठेपेक्षा शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळेल, अशा अन्य राज्यातील बाजारपेठा खुणावत आहेत. यामधून शेतकऱ्यांना कांद्याला योग्य व समाधानकारक भाव देणारी अशी’ बेंगलोर’ ची बाजारपेठ आपलीशी वाटू लागली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने भुरळच घातल्याचे दिसत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी बेंगलोरच्या मार्केटमध्ये राबता वाढला आहे. यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील तांदळी वडगाव, वडगाव तांदळी परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला पसंती देत आहेत. दररोज कांदा गोण्यांची किमान एक तरी मोठी गाडी भरून कांदा विक्रीसाठी बेंगलोरला पाठविला जात आहे.

शेतकऱ्यांना जवळचे मार्केट असताना दूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविण्याचे कारण काय? याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करताना अनेक प्रश्नांचा उलगडा झाला. बेंगलोरला कांदा विक्रीसाठी पाठविताना वाहतुकीचा खर्च मोठा असताना ही शेतकऱ्यांना बेंगलोरचे मार्केट फायदेशीर कसे ठरते ? याचे गणित तांदळी वडगावच्या शेतकऱ्यांनी चुटकी सरशी सोडविले.

कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटमध्ये बाजार भावात कायम सातत्य आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणात आला तरी तेथील बाजारभाव ढासळत नाहीत. जास्तीत जास्त एक ते दोन रुपयांचा फरक पडतो; परंतु, कांद्याची आवक कमी झाल्यास बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढतो.

त्यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येथील मार्केटमध्ये गेल्या ४० वर्षांपासून माल विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची आडत घेतली जात नाही. एक नंबर कांद्याला चांगला भाव मिळतोच पण दोन, तीन, चार नंबर कांद्याला इतर बाजारपेठेपेक्षा बेंगलोरच्या मार्केटमध्ये दुप्पट भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा खराब झालेला कांदाही येथे चांगल्या भावात विकला जातो. इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये वजनातील घट जास्त प्रमाणात धरली जाते.

मात्र, बेंगलोरच्या मार्केटमध्ये अत्यंत कमी प्रमाणात घट धरली जाते. यातूनही शेतकऱ्यांचा फायदा होतो. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक अथवा लूट येथे होत नाही. विकलेल्या मालाचे पैसे चोवीस तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकरकमी जमा केली जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कांदा लिलावाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास जागेवरच फेरलिलाव केला जात असल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांचा बेंगलोर मार्केटवर पूर्ण विश्वास असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. येथील व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोजच्या कांदा बाजारभावाची माहिती पुरविली जात
आहे.

बेंगलोरला कांदा विक्रीसाठी पाठविण्यासाठी मोठा वाहतूक खर्च येत आहे. शासनाने शेतकऱ्यांचा कांदा रेल्वेद्वारे पाठविण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. रेल्वे विभागाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘किसान बोगी उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होईल. खा. नीलेश लंके यांच्यासमवेत याबाबत शेतकऱ्यांनी चर्चा केली आहे. खा. लंके यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडून किसान रेल्वेचा प्रश्न मार्गी लावावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!