संगमनेर- कोंभाळणे (ता. अकोले) येथील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्याच शेतात भाताच्या वाणाची निवड, पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करत भात आवणी कशी करावी याचे धडे वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले.
कृषी अभ्यासक्रम अंतर्गत समाविष्ट असलेल्या भात आवणी या प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभवही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक अभ्यासांतर्गत भात आवणी या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कौशल्य विकसित होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कृषी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन जमिनीची मशागत करणे, पिकाची लागवड करणे, पिकाची काढणी करणे, साठवणूक करणे, अशा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना – अनुभव संपन्न केले जाते. त्याचाच न भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावातील शेतामध्ये भात आवणीचे प्रात्यक्षिक पार पडले.
याप्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी स्वतः भात आवणी करत सेंद्रिय आणि शास्त्रीय पद्धतीने भात आवणी कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरे देत आणि भाताच्या विविध वाणांची माहिती सांगत मार्गदर्शन केले.
तसेच या प्रात्यक्षिकांतर्गत विद्यार्थ्यांनी रोपवाटिका तयार करणे, शेतीची मशागत पाणी व्यवस्थापन आणि रोपे लावणे, याबाबत शास्त्रीय माहिती राहिबाईंच्या अनुभवातून जाणून घेतली. भात आवणी प्रात्यक्षिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डी. बी. गोलांडे, प्रा. ए. एन. सहाणे, प्रा. पी. डी. शिंदे आणि प्रा. पी. एस. हापसे, प्रा. एस. पी. कारंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
पारंपारिक बीज संवर्धनातून देशी वाणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या पद्मश्री राहिबाईंनी दीडशेहून अधिक देशी वाणांच्या बियाणांची बँक तयार केली आहे. या बँकेलाही विद्यार्थ्यांनी यावेळी भेट दिली. भेटी दरम्यान राहिबाईंनी बियाणांचे संकलन, साठवणूक, नोंदवही पद्धती, उत्पादन आणि बीज संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.