पाथर्डी- वीजबिल थकल्याने शेवगाव – पाथर्डी पाणीयोजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून बंद झाल्याने पाथर्डी शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गेल्या सहा ते नऊ दिवसांपासून शहराच्या विविध भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. पिण्याच्या पाण्याचे जार, सांडपाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी भाव वाढ केली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
पाथर्डी शहरासह शेवगाव शहर व दोन्ही तालुक्यातील मिळून ५४ गावांना जायकवाडी योजनेमधून पिण्याचा पाणीपुरवठा होतो. दोन्ही पालिकांसह ग्रामीण भागाची कोट्यवधी रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे. त्यातही समाधानाची बाब म्हणजे या सर्व थकबाकीपैकी हप्ते पद्धतीने नियमित हप्ते पाथर्डी पालिकेकडून दिले जातात.

गेल्या काही दिवसांमध्ये बिलाची कुठलीच बाकी न भरल्याने पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने योजनेचा पाणीपुरवठा बंद केला. त्यापूर्वी तांत्रिक बिघाड सांगत दोन दिवस शहराला पाणीपुरवठा विभागाकडून पाणी मिळाले नाही. शहराची दैनंदिन गरज सुमारे ३२ लाख लिटरची असून, गेल्या अनेक महिन्यांपासून शहराला २२ ते २६ लाख लिटर दैनंदिन पाणीपुरवठा होतो.
पाणी उपसा करणाऱ्या वीजपंपांची क्षमता कमी झाल्याने पुरेशा क्षमतेने पाणी उपसले जात नाही. पंधरा तास पाणीपुरवठा म्हणजे ३० ते ३२ लाख लिटर पाणी असा ढोबळ आकडा गृहीत धरला जातो. पूर्वी ती परिस्थिती बरोबर होती, पण आता सदोष वीज पंपांमुळे ९० हजार ते एक लाख वीस हजार लिटर ताशी पाणी मिळते.
बऱ्याचदा पाईपलाईन फुटते, वादळात तारा तुटल्या, खांब पडले, अशी कारणे सांगत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना बोलू दिले जात नाही. यापूर्वी तीन दिवसाआड पाथर्डीला पाणीपुरवठा होत होता, तो आता सहा ते नऊ दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
शहरात पावसाने ओढ दिल्याने हातपंप व खासगी उद्भवांना समाधानकारक पाणीसाठा वाढलेला नाही. सर्वत्र साथ रोगाचा प्रादुर्भाव शहरात सुरू असून, घाणीचे साम्राज्य, मोकाट जनावरांचा त्रास सहन करत लोकांना मिळेल तिथून पाणी मिळवावे लागते. २०० लिटरच्या बॅरलची किंमत आता दोनशे रुपये झाली आहे. पाण्याच्या जारची किंमतही २० ते २५ रुपयांपर्यंत असून, या समस्येकडे कोणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.
पाथर्डी पालिकेची सुमारे तीन वर्षांची तर अन्य ठिकाणची पाणीपट्टी त्याहून अधिक वर्षांपासून थकीत आहे. ग्रामीण भागात तर पाणीपट्टी कधी भरली जाते, याचा मेळ पंचायत समितीलासुद्धा सांगता येत नाही. ढगाळ हवामानामुळे विविध आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच पिण्यास अयोग्य पाणी अथवा प्रक्रिया न केलेले पाणी प्यावे लागत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात सध्या पाणीपुरवठा नवीन योजनेचे काम चालू असून, त्यासाठी रस्ते उकारले जात आहेत. अरुंद रस्ते, त्यातच खड्डे, त्यातून पाईपलाईनचे काम चालू असताना तुटलेले नळ अशा परिस्थितीत नागरिक जगत आहेत. तुटलेले पाईप जोडण्यासाठी ठेकेदार कुणालाही जुमानत नाही. गेल्या चार महिन्यांपासून जुन्या जैन स्थानकाजवळील नळ ठेकेदाराकडून तुटला असून, पालिका अथवा ठेकेदार कोणीही त्याची दुरुस्ती न केल्यामुळे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी किमान पाऊण तास अर्धा इंची नळाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते.
सर्वसामान्य नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून कोणी वाली आहे की नाही, असा सवाल संतप्त लोकांमधून विचारला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून मोकाट फिरणारी एक गाय अचानक उधळते, दिसेल त्याला शिंग मारते. दुचाकी गाड्या पाडते. अवघ्या दोन मिनिटात संपूर्ण परिसर निर्मनुष्य होतो. भटकी जनावरे पकडण्यासाठी पालिकेकडे तज्ज्ञ माणसे व साधन सामग्री नाही. मोकाट कुत्र्यांची झुंड कधी अंगावर धावून येईल याचा नेम नाही. अशा वातावरणात पाणी मिळवण्यासाठी महिला, शाळकरी मुले जीव मुठीत धरून वावरतात.
योजना नवीन होणार आहे. या नावाखाली लोकांना अनेक दिवसांपासून झुलवत ठेवले जात असून, जुन्या योजनेचे कालबाह्य झालेले वीजपंप बदलण्यासही त्यामुळे टाळाटाळ केली जाते. पाणी येईल त्यावेळेस येईल, योजना जेव्हा चालू व्हायची त्यावेळेस होईल, पण आज आम्हाला पाण्यापासून का मारता? असा लोकांचा सवाल आहे. पूर्वीसारखे दोन दिवसाला पाणी मिळावे, जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही योजनेवरील गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर पालिकेने स्वखर्चाने टँकरने शहराला पाणीपुरवठा करावा, अशी लोकांची मागणी आहे.
याबाबत पालिकेचे अभियंता सचिन राजभोज यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, थकीत पाणीपट्टीपोटी दहा लाखांचा चेक संबंधित विभागाला दिला आहे. लवकरच सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. याबाबत आपण वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या संपर्कात आहोत. जर आजपासून पाणी सुरू झाले तर उद्या सकाळी पहिले आवर्तन सोडून दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शहराचे सहा विभागांमध्ये आवर्तन पद्धतीने पाणी सोडले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू पाटील बोरुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पालिकेच्या नागरी सुविधा पूर्णपणे कोलमडल्या असून, मोकाट जनावरे, मोकाट कुत्री यांच्या त्रासाबरोबरच शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरातला पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे. पाथर्डींची जनता जसे डोक्यावर घेते, तसे पायाखालीसुद्धा तुडवते. याचे भान प्रशासनाने ठेवले पाहिजे. पाण्यासाठी लोकांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या गुरुवारी आपण पालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करणार आहोत.